अविनाश साबापुरे
यवतमाळ : जगात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील जंगलांमध्ये वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्राणिगणना केली जाणार आहे. या गणनेच्या वेळी वन्यप्रेमींनाही जंगलाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी वनविभागाने ‘निसर्गानुभव’ हा उपक्रम घोषित केला आहे. नागरिकांना पौर्णिमेच्या चांदण्यात तऱ्हेतऱ्हेचे प्राणी न्याहाळता यावेत, यासाठी मचाणेही उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या मचाणांचे ऑनलाइन बुकिंग करण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मग काय? बुक करा तुमचे मचाण अन् चला वाघांच्या प्रदेशात..!
मेळघाट व्याघ्रप्रकल्पाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या अखत्यारीत विदर्भातील तब्बल सहा वन्यजीव विभाग येतात. त्यांतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य, पैनगंगा अभयारण्य या ठिकाणी वाघांची मोठी संख्या आहे. त्यासोबतच चिखलदरा, सेमाडोह, सोमठाणा, शहानूर, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, लोणार, ज्ञानगंगा, आदी ठिकाणीही घनदाट जंगल आणि समृद्ध प्राणिविश्व आहे. या सर्वच ठिकाणी ५ मे रोजी पौर्णिमेच्या रात्री प्राणिगणना केली जाणार आहे. त्या दरम्यान, वन्यप्राणिप्रेमी नागरिकांनाही सहभागी होता येणार असून, त्यासाठी ‘निसर्गानुभव’ हा उपक्रम घोषित करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी एकंदर १६५ मचाणांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांतील काही मचाणे व्हीआयपींसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या मचाणांवर बसून वन्यप्राणी पाहायचे असतील तर ‘मॅजिकल मेळघाट डाॅट इन’ या संकेतस्थळावर नोंदणी करणे मात्र आवश्यक आहे. प्राणिगणनेच्या निमित्ताने असेच उपक्रम महाराष्ट्रातील अन्य जंगलांमध्येही राबविले जाणार आहे.
अभयारण्यात येथे असतील मचाणे
- टिपेश्वर अभयारण्य :
सुन्ना जंगल सफारी गेट परिसरात १२ मचाणे असतील. त्यातील दोन मचाणे व्हीआयपींसाठी आरक्षित असतील. माथनी जंगल सफारी गेट परिसरात ६ मचाणे असतील. त्यातील १ व्हीआयपीसाठी राखीव असेल.
- पैनगंगा अभयारण्य :
खरबी वनविश्रामगृह परिसरात ५ मचाणे असतील. त्यातील एक व्हीआयपीसाठी राखीव असेल. कोरटा क्षेत्रातील चिखली विश्रामगृह परिसरातील सर्व आठ मचाणे वनप्रेमींसाठी उपलब्ध असतील. बीटरगाव क्षेत्रातील ७ आणि सोनदाभी क्षेत्रातील ५ मचाणेही वनप्रेमींसाठी असतील.
मेळघाट वन्यजीव विभाग
घाटांग ३, गाविलगड ३, जामली ३, अकोट ४, धुळघाट येथे २ मचाणे असतील. सीपना वन्यजीव विभागातील सेमाडोह येथे सर्वाधिक २५ मचाणे असतील; तर चिखलदरा १५, ढाकना १३, तारुबांदा येथे १० मचाणे असतील. अकोट वन्यजीव विभागात शिवपूर ३, शहानूर १२, नरनाळा येथे ९ मचाणे राहतील.
अकोला वन्यजीव विभाग
काटेपूर्णा बार्शीटाकळी ७, कारंजा सोहाेळ २, ज्ञानगंगा अभयारण्य १३ व लोणार अभयारण्यात १ मचाण असेल.
वन्यप्राणी पाहताना नियम मात्र पाळा
- एका मचाणावर वनविभागाचा एक प्रतिनिधी व एक निसर्गप्रेमी असे दोघेच असतील.
- मचाणावर बसल्यानंतर आपसांत बोलू नये. त्यामुळे वन्यप्राणी विचलित होतील.
- भडक किंवा अतिशुभ्र कपडे घालू नयेत.
- उग्र वास असलेले सुगंधित द्रव्य कपड्यांवर लावू नये.
- रात्री वन्यप्राणी पाहताना सर्चलाइट किंवा विजेरी वापरू नये.
- मचाणावर मद्यपान, धूम्रपान करू नये, पाॅलिथिन पिशवी टाळावी.