लोकमत न्यूज नेटवर्क घाटंजी : तीन महिन्याची थकीत मजुरी मिळावी, या मागणीसाठी जरूर येथील मजुरांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्राऊटिस्टचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्त्वात आयोजित या आंदोलनात अन्यायग्रस्त मजूर सहभागी झाले होते. जरूर येथील मजुरांनी शेताच्या ढाळीचे बांध कामावर काम केले. याची मजुरी १५ दिवसात मिळणे अपेक्षित होते. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरी नसल्याने बी-बियाणे, खतेही खरेदी करता आली नसल्याने शेती पडीत राहण्याची वेळ आली आहे. संबंधितांकडे पाठपुरावा करूनही चालढकल सुरू आहे. मजुरी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल, अशी भूमिका मजुरांनी घेतली आहे. नायब तहसीलदार संतोष गजभिये यांच्या सूचनेनुसार सहायक गटविकास अधिकारी आरेवार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. दहा दिवसात मजुरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. जरूरचे उपसरपंच मोरेश्वर वातीले, हरिभाऊ पेंदोर, मनोज राठोड, मोहन पवार, गजानन चव्हाण आदी चर्चेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी रामदास महाराज मांडवकर, ज्ञानेश्वर सोनडवले, संभाजी हेमके, गोपाळ नामपेल्लीवार, निखिल कचरे, हरी राठोड, माजी सरपंच पवन लांडगे, ग्राम रोजगारसेवक अनिल पवनकर, संजय पेंदोर, संतोष वरपटकर, बळीराम मोहिते, काशीराम वेट्टी, धुरपता कुसराम, कोंडाबाई किनाके, विमल मेश्राम, गिरजाबाई कनाके, सावित्री मंडाले, अनिता मोहजे, अंबादास कोहचाडे आदी सहभागी झाले होते.
जरूर येथील मजुरांचे घाटंजीत आंदोलन
By admin | Published: July 08, 2017 12:31 AM