जिल्हा परिषदेला कोर्टाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:07 AM2019-03-09T00:07:28+5:302019-03-09T00:08:34+5:30
उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवरील आमंत्रित शिक्षक सदस्याची निवड करण्यात आली. मधुकर काठोळे यांची निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आदेश काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवरील आमंत्रित शिक्षक सदस्याची निवड करण्यात आली. मधुकर काठोळे यांची निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आदेश काढले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर दोन शिक्षकांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ही निवड रखडली होती. पदाधिकाऱ्यांच्या नजीक असलेल्या शिक्षक नेत्यांना सामावून घेण्यासाठी दुसºया सदस्याची निवडही लांबणीवर पडली होती. याबाबत शिक्षण समितीत अनेकदा गरमागरम चर्चा झाली. सदस्यांनी निमंत्रित सदस्यांची निवड करण्याची मागणी केली. शिक्षण विभागाकडून फाईल जावूनही अनेकदा त्यात त्रुटी काढण्यात आल्या. यामुळे दोन वर्षांपासून निवड रखडली होती.
अखेर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर काठोळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरून न्यायालयाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जवाब सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे तडकाफडकी पावले उचलून तत्काळ काठोळे यांची शिक्षण समिती सदस्यपदावर निवड झाल्याचे पत्र सीईओंनी निर्गमित केले. आता दुसºया सदस्यपदासाठी अनेक शिक्षक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. सर्वात मोठ्या संघटनेच्या नेत्याला सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा नियम आहे. त्यामुळे नेमकी कोणत्या संघटनेच्या नेत्याची सदस्यपदी निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
११ मार्चला मुलाखती
शिक्षण समितीवर दोन शिक्षक नेत्यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते. आता काठोळे यांची निवड झाल्याने उर्वरित एका नेत्याची निवड होणार आहे. त्यासाठी ११ मार्च रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहे. विविध शिक्षक संघटनांचे नेते त्यासाठी फिल्डींग लावून आहे. जवळपास बारा शिक्षक नेत्यांचे सदस्य पदासाठी चर्चेत आहे.