यवतमाळ - जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणारे भाजपा नेते, यवतमाळचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यवतमाळ येथील न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) यांनी 14 मे रोजी हे आदेश दिले आहेत.
मदन येरावार आणि त्यांच्या इतर 16 जणांनी मिळून शहरातील मोक्याची जागा बनावट कागपत्रांच्या आधारे विकली होती. जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे यांच्यासह बारा जणांनी मिळून जागेची खोटी कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे त्यांनी भूमिअभिलेख उपअधीक्षक, सहायक दुय्यम निबंधक यांच्या मदतीने तयार करून जागा पालकमंत्री मदन येरावार आणि क्रिकेट सट्टा माफिया अमित उर्फ बंटी चोखानी यांना हस्तांतरीत केली. यामुळे आयुषी किरण देशमुख यांनी पालकमंत्र्यांसह 16 जणांवर न्यायालयात याचिका दाखल केली. यावर 14 मे रोजी न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायालयाने यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावरा, भाजपा नेते आणि जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, जयश्री ठाकरे, विजयश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, अमित चखानी तसेच तत्कालीन भूमिअभिलेख अधिकारी, तत्कालीन नगर परिषद सीईओ यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
अलीकडेच 'लोकमत'ने कोट्यवधींचा भूखंड खरेदी घोटाळा उघडकीस आणला. त्याच घोटाळ्याची ही एक कडी मानली जाते. भूखंड घोटाळ्यात आता पर्यंत 7 गुन्हे दाखल झाले असून 15 जणांना आरोपी बनविण्यात आले. त्यातील दोघे 8 महिन्यांपासून कारागृहात आहेत. या घोटाळाच्या चौकशीसाठी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी 16 सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते, हे विशेष.