लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महागाव तालुक्यातील वडद (मुडाणा) येथील नारायण भगाजी ठाकरे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली. या आगीत लाखोंच्या साहित्यासह तब्बल ११ शेळ्या आणि ५० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. बुधवारी शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील सर्व साहित्य खाक झाले. गोठ्यात बांधून असलेल्या ११ शेळ्या आणि ५० कोंबड्यांचाही होरपळल्याने तडफडून मृत्यू झाला. गोठ्यात ३० टीनपत्रे, मौल्यवान लाकडी साहित्य, तुषार सिंचन पाईप व इतर शेती अवजारे ठेवलेली होती. हे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. गोठ्यात साठवून ठेवलेला दहा क्विंटल कापसाचीही राखरांगोळी झाली. विशेष म्हणजे गोठ्यात विजेची व्यवस्था नाही. त्यामुळे कुणी तरी वैमनस्यातून ही आग लावली असावी असा कयास शेतकरी नारायण ठाकरे यांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच गुरुवारी महसूल विभागाने घटनास्थळ गाठून नुकसानीचा पंचनामा केला. शेतकऱ्याचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथिमक अंदाज वर्तविला जात आहे.