यवतमाळ : जिल्ह्याचा क्राईम रेट अर्थात दरवर्षी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या बरीच मोठी आहे. ही संख्या नियंत्रित करण्यावर आपला अधिक भर राहणार आहे, अशी माहिती यवतमाळचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आपल्या येथील पहिल्या पत्रपरिषदेत सोमवारी दिली. एसपी राज कुमार म्हणाले, वाढलेला क्राईम रेट कमी करणे हे पहिले आव्हान आहे. यवतमाळात संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात ंआहे. त्यालाही प्रतिबंध घातला जाईल. यवतमाळची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची गरज आहे. सध्या ती अस्ताव्यस्त आहे. १८ ते २१ वयोगटातील तरुणांचा गुन्हेगारीकडे कल वाढत असून त्यांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.एम. राज कुमार हे तामिलनाडूमधील असून २००६ च्या तुकडीचे आयपीएस आहेत. त्यांनी साताऱ्यामध्ये प्रोबेशन पूर्ण केले. उस्मानाबाद व गडचिरोलीला नक्षल विरोधी अभियानात ते एएसपी होते. मुंबईला सायबर क्राईम व नंतर नागपूरला उपायुक्त होते. यवतमाळात एसपी म्हणून त्यांची पहिलीच नियुक्ती आहे. (कार्यालय प्रतिनिधी) उमरखेडला स्वतंत्र एसडीपीओंचा प्रस्ताव ४पुसद विभागाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. पोलीस दप्तरी संवेदनशील म्हणून हा विभाग ओळखला जातो. म्हणूनच पुसदला स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे आणि तो मंजुरीच्या दृष्टीने पाठपुरावा केला जाईल.
क्राईम रेट, संघटित गुन्हेगारी नियंत्रणावर भर
By admin | Published: January 24, 2017 2:30 AM