असमतोल : एक पोलीस निरीक्षक आणि दहा गुन्ह्यांचा तपासयवतमाळ : अमरावती विभागात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडील (सीआयडी) गुन्ह्यांचा प्रचंड असमतोल निर्माण झाला आहे. कुठे दोन तर कुठे १२ गुन्हे तपासाला आहेत. हा समतोल साधण्यासाठी आता यवतमाळ सीआयडीकडील गुन्हे अकोला आणि वाशिम सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे. यवतमाळ सीआयडीला गेली कित्येक वर्षे पूर्णवेळ तपास अधिकारी उपलब्ध झाले नाही. कधी वाशिम तर कधी अमरावतीच्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त प्रभार राहिला. तपासाला अधिकारीच नसल्याने सीआयडीकडील गुन्हे थंडबस्त्यात राहिले. सध्याही सीआयडीकडे डझनावर गुन्हे तपासासाठी दिलेले आहेत. काही महिन्यांपूर्वीच येथे पुण्यावरुन सोमेश्वर खाटपे हे पोलीस निरीक्षक रुजू झाले. त्यांचीही बरीच नोकरी ट्रॅफिक आणि साईड ब्रँचला झाल्याने सीआयडी सारख्या शाखेत आव्हानात्मक व गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना त्यांची कसोटी लागते आहे. सीआयडीचा अमरावती विभागातील कारभार पुण्यापर्यंत गाजतो आहे. या विभागात गुन्ह्यांच्या तपासात असमतोल निर्माण झाला आहे. अकोला, बुलडाणा, वाशिमकडे अवघे दोन ते तीन गुन्हे तपासाला आहेत. त्या तुलनेत यवतमाळ सीआयडीकडील गुन्ह्यांचा आकडा डझनावर पोहोचला आहे. सहा ते आठ वर्षांपासूनची प्रकरणे यवतमाळ सीआयडीला आतापर्यंत मार्गी लावता आलेली नाही. ‘तपासाला पूर्ण वेळ अधिकारीच नाही’ आणि यंत्रणेची बहुतांश एनर्जी ही अमरावती-नागपूर-पुण्यातील बैठका तसेच उच्च न्यायालयातील तारखांवरील हजेरीतच खर्च होत असल्याचे कारण त्यासाठी सांगितले जाते. डझनांवर गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणे यवतमाळ सीआयडीच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे पाहून अखेर येथील काही गुन्हे सीआयडीच्या वाशिम व अकोला युनिटकडे वर्ग करण्यात आले आहे. पहायला हे गुन्हे वर्ग झाले असले तरी त्याच्या कागदपत्रांची ने-आण आणि रेकॉर्ड मेंटेनन्ससाठी यवतमाळ सीआयडीचीच यंत्रणा वापरली जात असल्याने ‘गुन्हे वर्ग करुन उपयोग काय’ अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. आजही यवतमाळ सीआयडीकडे सुमारे दहा गुन्ह्यांचा तपास आहे. यातील काही गुन्हे जुने आहेत. अलिकडेच भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेटमधील अडीच कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा सीआयडीकडे तपासाला देण्यात आला आहे. सहसा आर्थिक गुन्हे सीआयडीच्या पुणे मुख्यालयाकडे वर्ग केले जातात. परंतु तेथेही या गुन्ह्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळेच ‘बीएचआर’च्या गुन्ह्याचा तपास यवतमाळ सीआयडीतच करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ३८ ट्रक बोगस पासिंगचा गुन्हा तपासातच !यवतमाळच्या डेप्युटी आरटीओ कार्यालयाने सन २००६ मध्ये ३८ ट्रकचे बोगस पासिंग केले होते. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे आहे. परंतु गेल्या आठ वर्षात सीआयडीला त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करता आलेले नाही. सीआयडीने तयार केलेल्या दोषारोपपत्रात पुणे मुख्यालयातून अनेक त्रुट्या काढण्यात आल्या होत्या. सीआयडीने या ट्रक पासिंग घोटाळ्यात चक्क आरटीओच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच ‘क्लिनचीट’ दिली होती. ‘लोकमत’ने या गंभीर प्रकारावर ‘प्रकाशझोत’ टाकल्यानंतर सीआयडीने या दोषारोपपत्रातील त्रुट्या दूर करण्याचे काम हाती घेतले. बोगस ट्रक पासिंगचा हाच गुन्हा आता वाशिमकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
‘सीआयडी’कडील गुन्हे अकोला-वाशिमकडे वर्ग
By admin | Published: August 26, 2016 2:23 AM