यवतमाळ :
येथील विक्रीकर विभागातील सहायक आयुक्तांचा ऑगस्ट २०२० मध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशावरून गुरुवारी लोहारा पोलिसांनी आयुक्तांची उपजिल्हाधिकारी असलेली पत्नी व तिच्या सहा नातेवाईकांविरुद्ध संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन वर्षापूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद घेतलेले प्रकरण खुनाच्या गुन्ह्यात आले असून त्याचा तपास केला जात आहे.
शरदकुमार सुधाकर खंडाळीकर (३२) रा. राजनगर नांदेड असे मृत सहायक आयुक्ताचे नाव आहे. ते यवतमाळ येथे राजस्व कॉलनी वाघापूर येथे वास्तव्याला होते. त्यांचा २५ ऑगस्ट २०२० ला रात्री २ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. शरदकुमार यांचा मृत्यू नसून खून झाल्याची तक्रार सुरेंद्र खंडाळीकर यांनी दिली. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी स्नेहा चंद्रशेखर उबाळे ऊर्फ स्नेहा शरदकुमार खंडाळीकर (३७), अभिषेक चंद्रशेखर उबाळे (३०) (मुंबई पोलीस), अशोक खोळंबे (५६), मनिषा अशोक खोळंबे (५४), अक्षय अशोक खोळंबे (३०) रा. भगीरथीविहार सहकारी गृहनिर्माण संस्था शिरसगाव बदलापूर ता. अंबरनाथ जि. ठाणे, कपिल सातपुते (३३), अंकिता कपिल सातपुते रा. उल्हासनगर जि. ठाणे यांनी संगनमताने शरदकुमार यांचा खून केल्याचे नमूद केले होते. मात्र त्यावेळी या प्रकरणात कुठलीही नोंद घेण्यात आली नाही.
सुधाकर खंडाळीकर यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. सत्र न्यायाधीश जी.जी. भन्साली यांनी गुन्हा दाखल करून पाेलिसांनी तपास करावा, असा आदेश दिला. त्यावरून लोहारा पोलिसांनी बुधवारी सात जणांविरुद्ध कलम ३०२, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे करीत आहे.