महागाव : तालुक्यातील इजनी येथील महिला बचत गटाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. याच वादातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष तसेच त्रिमूर्ती महिला बचत गटाच्या सचिव आणि तालुका शिवसेना प्रमुख विरुद्ध परस्पर तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष सुरेखा नरवाडे यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे व रवींद्र भारती यांच्याविरुद्ध खंडणी तसेच छेडछाड केल्यावरून भादंवि ३५४, ३५४ (ए), ३८४, ३२३,२९४, ५०६ ३४ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात त्रिमूर्ती महिला बचत गटाच्या सदस्य वंदना गजानन वाघमारे यांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष सुरेखा नरवाडे, दादाराव नरवाडे आणि अष्टविनायक नरवाडे यांच्याविरुद्ध भादंवि २९४, ३२३, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यातील ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, तर अन्य गुन्ह्यांचा तपास महागाव पोलीस करीत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्यात हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी आहे. मात्र, तालुका स्तरावर त्यांच्यात ताळमेळ नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
बॉक्स
सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही
सोमवारी त्रिमूर्ती महिला बचत गटाच्या काही सदस्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठून अध्यक्षांविरुद्ध तक्रार दिली होती. त्यात गटाला नफा मिळत असताना अध्यक्ष तो सदस्यांना देत नाही, असा आरोप करण्यात आला होती. सदस्यांनी बीडीओंना निवेदन दिले होते. त्यावेळी अध्यक्ष व सदस्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. नंतर हा वाद वाढल्याने तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला.