यवतमाळ : नागपूर ही राज्याची क्राईम कॅपिटल आहे. आता त्या पाठोपाठ गुन्हेगारी जगताला मिळणाऱ्या राजकीय आशीर्वादामुळे यवतमाळ ही दुसरी क्राईम कॅपिटल झाली असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी येथे केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी सायंकाळी दारव्हा मार्गे यवतमाळात दाखल झाली. या यात्रेला संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी यांनी राज्यातील वाढती गुन्हेगारी व त्यात राजकीय आशीर्वादामुळे नागपूर व यवतमाळने घेतलेली आघाडी यावर तीव्र चिंता व्यक्त केली. या दोन्ही शहरांची ओळख आता गुन्हेगारांची शहरे म्हणून झाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात तर पालकमंत्री मदन येरावार यवतमाळात गुंडांना पाठबळ देत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. हाच धागा पकडून अजित पवार, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे यांनीही आपल्या भाषणात नागपूर व यवतमाळातील वाढत्या गुन्हेगारीचा उल्लेख केला.