उमरखेड (यवतमाळ) : पालिकेत ६५ लाख ७० हजार रुपयांचा घनकचरा घोटाळा उघडकीस आला. त्यात तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान भाजप आमदारांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. आता या गुन्ह्यामध्ये या सर्वांविरुद्ध कट रचल्याचा वाढीव गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे सर्व ११ आरोपींच्या अडचणींत वाढ झाली आहे.
घनकचरा घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान भाजप आमदार नामदेव ससाने यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, रोखपाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव, नगरसेवक राजू उर्फ चंद्रशेखर जयस्वाल, दिलीप सुरते, अमोल तिवरंगकर, सविता पाचकोरे, कंत्राटदार गजानन मोहळे आणि फिरोज खान यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या शाखेने पालिकेतून महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले. त्याच्या तपासणीअंती या सर्व आरोपींविरुद्ध संगनमताने कट रचल्याप्रकरणी भादंवि १२० (ब), ४०६ नुसार वाढीव गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे आरोपींच्या अडचणींत वाढ झाली आहे.
शहरातील घनकचरा उचलण्याच्या या घोटाळ्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व जण भूमिगत झाले होते. त्यापैकी पाच जणांनी ९ फेब्रुवारीला पुसदच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. १४ फेब्रुवारीला त्यावर सुनावणी झाली. त्यात आमदारांसह पाच जणांना २८ फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. या पाच जणांमध्ये आमदार नामदेव ससाने, चंद्रशेखर जयस्वाल, दिलीप सुरते, अमोल तिवरंगकर व सविता पाचकोरे यांचा समावेश आहे. त्यांच्या अर्जावर पुन्हा २८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, १७ फेब्रुवारीला पोलिसांनी न्यायालयात ‘से’ दाखल केला. त्यात सर्व ११ आरोपींविरुद्ध कट रचल्याचा वाढीव गुन्हा नोंदविण्यात आल्याचे नमूद आहे. या दरम्यान तत्कालीन मुख्य लेखापाल व आरोग्य निरीक्षक यांच्यासह दोन कंत्राटदारांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु आता ही सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
गुन्हे शाखेचे पथक तळ ठोकून
या गुन्ह्याचा तपास उमरखेड पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. या शाखेचे पथक गेल्या तीन दिवसांपासून उमरखेडमध्ये तळ ठोकून आहे. पथकातील सदस्य कसून चाैकशी करत आहेत. आता आरोपींवर कट रचल्याचा वाढीव गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.