यवतमाळ : निळोणा धरण परिसरात प्रेमीयुगुलाला त्रास दिल्याचा वचपा म्हणून पतसंस्थेच्या पिग्मी एजंटाचे शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्थानिक येरावार चौकातील इंद्रप्रस्थ प्लाझा येथून अपहरण करण्यात आले. या एजंटाला उमरसरा येथील बाबाजी दाते टेकडी परिसरात नेऊन खोलीत डांबण्यात आले. तेथे त्याला मारहाण करून त्याची चित्रफितही बनविण्यात आली. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने क्रूरतेकडे जाणारा हा प्रकार थांबला.रवींद्र वामन राठोड (२३) रा. चौधरा असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रणव माने, नितीन डेम्मेवार, प्रवीण मडावी, रवी फुलकर, प्रसाद वाजपेयी सर्व रा. उमरसरा असे संशयित आरोपींची नावे आहे. यातील प्रणव माने याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याजवळून मारहाणीची चित्रफीत काढलेला मोबाईल जप्त केला आहे. रवींद्र हा येरावार चौकातील एका पतसंस्थेसाठी पिग्मी एजंट म्हणून काम करतो. शुक्रवारी सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे पतसंस्थेत आला. त्यावेळी त्याला एका तरुणाने बाहेर बोलाविले. काही कळण्याच्या आतच त्याला चाकू लावून जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्यात आले. तेथून दारव्हा नाका परिसरात जाऊन आणखी दोघांना सोबत घेऊन उमरसरा परिसरातील बाबाजी दाते टेकडी जवळच्या गोरक्षण परिसरात निर्जनस्थळी रवींद्रला आणले. तिथे एका पडक्या खोलीत आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचे मोबाईल शूटिंग करण्यात आले. दरम्यान अपहरण झाल्याची माहिती तातडीने शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पतसंस्थेतूनच रवींद्रचे अपहरण झाल्याचे त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. यवतमाळात असलेल्या नातेवाईकांनी शहर ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने प्रभारी ठाणेदार संग्राम ताटे यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पतसंस्था व त्या व्यापारी संकुल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून आरोपींची ओळख पटली व शोध सुरू झाला. पोलिसांनी तपास काढत गोरक्षण परिसर गाठला. तेथे त्यांना रवींद्र हा आढळून आला. दरम्यान आरोपी पसार झाले होते. हा प्रकार रवींद्रने निळोणा धरण परिसरात प्रेमीयुगुलाला त्रास दिल्याचा वचपा म्हणून काढल्याची माहिती समोर आली. यातूनच त्याचे अपहरण करण्यात आले. मात्र सुर्दैवाने पोलीस पोहोचल्याने रवींद्र सुखरुप राहिला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. (कार्यालय प्रतिनिधी) ४उमरसरा येथील बाबाजी दाते टेकडी परिसरातील ही सलग दुसरी घटना आहे. गुरुवारी याच परिसरात अमन मिश्रा या शालेय विद्यार्थ्याचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच शुक्रवारी पतसंस्थेच्या पिग्नी एजंटाच्या अपहराचे प्रकरण उघडकीस आले. आरोपींनी या एजंटाला याच टेकडी परिसरातील एका घरात नेऊन मारहाण केल्याचे पुढे आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
पतसंस्था एजंटाचे भरदिवसा अपहरण
By admin | Published: March 19, 2016 2:11 AM