पर्यावरण संतुलित : शौचालयाच्या कुटुंब संख्येत हवी २५ टक्के वाढ यवतमाळ : गावाच्या संपूर्ण विकासासाठी पर्यावरण संतुलित ग्राम समृध्द योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस पात्र ठरलेल्या ग्रामपंचायातीला भरपूर आर्थिक मदत दिली जाते. शासानाने या योजनेच्या निकषात बदल केला असून पूर्वी तीन वर्षापर्यंत आर्थिक लाभ दिला जात होता. आता हा कालावधी वाढविण्यात आला आहे. तसेच योजनेसाठी असलेल्या अटींमध्ये बदल करण्यात आले आहे. पर्यावरण संतुलित ग्राम समृध्द योजनेत निर्मल भारत अभियानातंर्गत २०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालय असलेल्या कुटुंब संख्येत २५ टक्के वाढ आणि ६० टक्के गाव हागणदारीमुक्त असणे आवश्यक आहे. द्वितीय वर्षातील ग्रामपंचायातीत झाडे जगण्याचे प्रमाण २५ टक्के पेक्षा अधिक हवे, तसेच ७० टक्के गाव हागणदारीमुक्त असण्याची अट घातली आहे. योजनेचा लाभ घेऊन तीन वर्ष पुर्ण झालेल्या ग्रामपंचायतीला चौथ्या वर्षीही लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी १० निकष ठेवण्यात आले आहे. त्यांची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतीला अनुदान देण्यात येणार आहे. योजनेतील गावांचे मूल्यांकन करणाऱ्या समित्यांमध्ये फेरबदल केले आहेत. आता एकही पदाधिकारी या समित्यामध्ये नाही. शासकीय अधिकाऱ्यांकडूनच मूल्यांकन केले जाणार आहे. तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि विभागीय समितीत त्या दर्जांचे अधिकारी राहणार आहेत. (कार्यालय प्रतिनिधी )
ग्रामसमृध्द योजनेचे निकष बदलेले
By admin | Published: July 22, 2014 12:03 AM