उमरखेड-महागावात रिमझिम पाऊस : इसापूर धरणात तीन टक्के पाणीसाठा लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : उपविभागातील उमरखेड आणि महागाव तालुक्यात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी अद्यापही सिंचन प्रकल्पात मात्र ठणठणाट आहे. तालुक्यासाठी जीवनदायी ठरणाऱ्या इसापूर धरणात आताही केवळ तीन टक्के पाणी आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असले तरी अनेक गावात पाणीटंचाईचे संकट कायम आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात यावर्षी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची लागवड केली. मृगात झालेल्या पावसाने पिके चांगली झाली. परंतु पावसाने दडी मारली. पिके करपू लागली होती. अशातच गत आठ दिवसांपासून पावसाने तुषार सिंचन सुरू केले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात गत महिनाभरात २२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर तीन दिवसात केवळ ३० मिमी पाऊस कोसळला. या पावसामुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील पिकांना संजीवनी मिळाली. शेतकऱ्यांत आनंद आहे. मात्र यंदा अद्यापही नदी, नाले, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. प्रकल्पातही पाणी नाही. दमदार पाऊस झाला नाही तर पाणीटंचाई झळ हिवाळ्यापासूनच लागू शकते. पैनगंगा नदीतही अद्याप पाणी वाहले नाही. एकीकडे पीक चांगले असले तरी जमिनीत खोलवर ओल दिसत नाही. उमरखेड तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्त्वाचे असणारे इसापूर धरण सध्या कोरडे दिसत आहे. प्रकल्पात केवळ तीन टक्के पाणीसाठा आहे. पैनगंगा नदीवरील ६० गावातील पाणीपुरवठा योजना याच प्रकल्पावर अवलंबून आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईचे संकट घोंगावू शकते. पुसद तालुक्यातील पूस धरणात केवळ १८ टक्के जलसाठा पुसद : शहरासह परिसरात गत तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. १८ जुलैच्या रात्रीपासून सकाळी ८ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस बरसत होता. गत २४ तासात २१ मिमी तर आतापर्यंत ५४८ मिमी पावसाची नोंद झाली. पिकांना पोषक पाऊस असला तरी पूस धरणाचा जलसाठा मात्र केवळ १८ टक्केच आहे. पुसद शहरासाठी संजीवनी असलेला पूस प्रकल्प अद्यापही कोरडा आहे. गतवर्षी या प्रकल्पात १८ जुलै रोजी ४२.२२ टक्के जलसाठा होता. परंतु यंदा केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. मात्र पाऊस रिमझिम का होईना कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
पीक बहरले, प्रकल्प कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:53 AM