पुरेसा पाऊस येईल, या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वरुणराजाने अवकृपा केल्यामुळे पाऊसच नाही. त्यामुळे पावसाअभावी सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस आदी पिके होरपळत आहेत. यावर्षी कपाशीपाठोपाठ सोयाबीनचा पेराही वाढला आहे. ५२ हजार ८७३ हेक्टर जमिनीपैकी तब्बल ३८ हजार ३०४ हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा आहे. त्याखालोखाल शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. यावर्षी बियाणाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे मशागतीसाठी शेतकऱ्यांना भरपूर खर्च करावा लागला. त्यात मागील दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. आधीच शेतकऱ्यांनी परिश्रम घेऊन आपल्या शेताची मशागत केली. खासगी सावकाराकडून पैसे घेतले, अनेकांनी उसनवारी करून बियाणे खरेदी केले. काहींनी तर घरचे दागिने गहाण ठेवून बियाणाची सोय केली. तसेच रासायनिक खते व इतर वस्तूंची खरेदी केली; परंतु महागडे बियाणे आता मातीमोल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु पाऊस तर सोडाच चांगले कडाक्याचे ऊन तापत आहे. त्यामुळे पिकांनी माना खाली टाकल्या. हे चित्र तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. आधीच शेतकऱ्यांनी उसनवारी करून खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन महागडे बियाणे खरेदी केले. परंतु हे बियाणे आता मातीमोल होत असल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी तरी कशी असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
५१ हजार हेक्टरमधील पिके धोक्यात़, पांढरकवडा तालुका : दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:27 AM