जवळा : आर्णी तालुक्यातील कापेश्वर येथे तणनाशक फवारणीने साडेचार एकरातील सोयाबीन पीक करपले आहे. शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.
कापेश्वर येथील शेतकरी बालाजी माधवराव ठाकरे यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. पिकाची उगवण होण्यापूर्वी त्यांनी जमिनीवर तणनाशक फवारणी केली. काही दिवसांनी उगवलेले साडेचार एकरातील सोयाबीन करपले. याबाबत बालाजी ठाकरे यांनी आर्णी तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
तक्रारीची दखल घेत शुक्रवारी तालुका कृषी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र, सावंगी येथील शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकारी यांनी शेताची पाहणी केली. त्यांना सोयाबीनची कोवळी रोपटी सुकत असल्याचे आढळले. शेतातील पूर्णपणे सोयाबीन करपल्याने ठाकरे यांचे दीड लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले. सदोष तणनाशकाच्या फवारणीने नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. लोणी येथे प्रदीप कोषटवार, अनंत कोषटवार यांच्या साडेसहा एकरांतील सोयाबीनही करपले आहे. फवारणीनंतर काही तासांतच पीक करपले. सदोष तणनाशके बाजारात असल्याचे यावरून समोर येत आहे.