लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’, ‘आज भीम जयंती आयी, साथ में खुशियाँ लायी’ अशा एकापेक्षा एक सरस सुमधूर गीतांचे स्वर पहाटेपासूनच यवतमाळकरांच्या कानावर पडत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात उत्साहाला उधाण आले होते. मध्यरात्री यवतमाळात फटाक्यांची आतषबाजी करून भीम जयंतीला उत्साहात प्रारंभ झाला.येथील बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ समता पर्व प्रतिष्ठानच्यावतीने सुवर्ण पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भल्या पहाटे सुमधूर भीम गीताने यवतमाळकर भारावून गेले होते. गायक घनश्याम पाटील, सीमा खान यांनी गीते सादर केली. पवन भारस्कर, आनंद जवादे, नौशाद खान, प्रकाश कुमरे यांनी त्यांना साथ दिली. संचालन मृणालिनी दहीकर यांनी केले. यानंतर समता सैनिक दलाच्या सैनिकांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली. त्याचवेळी पोलीस दलाच्या पथकाने विविध गीते सादर करून महामानवाला अभिवादन केले. याचवेळी बुद्ध वंदना सादर करण्यात आली. दरम्यान, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यवतमाळकरांची लांबच लांब रांग लागली होती.अभिवादनस्थळी समता सैनिक दलासोबतच विविध संघटना आणि स्वयंसेवकांनी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली होती. उमरसरा परिसरातील वसंत भगत, विनोद बन्सोड, आनंदराव बागेश्वर, खुशाल भगत, धर्मेंद्र नानवटकर, प्रफुल्ल भगत, अविनाश बन्सोड, विश्वास मनवर, अजय मनवर, पुरुषोत्तम रणवीर, वृंदा भगत, सारिका बन्सोड यासह अनेकांनी ही व्यवस्था केली होती.मोटरसायकल रॅलीने दणाणले यवतमाळडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तलावफैलातील पंचशील चौकातून सिद्धार्थ मंडळाने ही रॅली काढली. या रॅलीमध्ये हातात ध्वज घेतलेले आणि निळे फेटे बांधलेले तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागातून ही रॅली बाबासाहेबांचा जय-जयकार करीत काढण्यात आली.शहरात विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे फलक लावण्यात आले होते. दिवसभर शहरात उत्साहाचे वातावरण दिसत होते, तर बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तक व भीम गीतांच्या ध्वनीमुद्रिकांचे स्टॉल लक्ष वेधून घेत होते.समता दौडमध्ये धावले यवतमाळकरसमता पर्व प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत अजिंक्य गौतम गायकवाड मुलातून प्रथम, तर रिना मेश्राम ही मुलींमधून पहिली आली. यावेळी विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, समता पर्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, अंकुश वाकडे आदी उपस्थित होते.
उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 9:35 PM
‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’, ‘आज भीम जयंती आयी, साथ में खुशियाँ लायी’ अशा एकापेक्षा एक सरस सुमधूर गीतांचे स्वर पहाटेपासूनच यवतमाळकरांच्या कानावर पडत होते.
ठळक मुद्देबाबासाहेबांना अभिवादन : दिवसभर विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रम, समता पर्व प्रतिष्ठानतर्फे ‘सुवर्ण पहाट’