तालुक्यासाठी दररोज जवळपास एक हजार १०० डोसची मागणी असते. मात्र, जिल्ह्याकडून केवळ ३०० डोस देण्यात येतात. त्यामुळे लसीचा तुटवडा भासत आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात येतात. त्यांना परत जावे लागते. गेले तीन दिवस नागरिक लस घेण्यासाठी येत आहे. त्यातील अनेकांना परत जावे लागत आहे. यामुळे कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्याची डेडलाईन निघून जाते की काय, अशी शेकडो लोकांना भीती आहे.
उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील वसंतनगर व गढी वॉर्ड येथील नागरी सुविधा केंद्रातही कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, त्यांनाही परत जावे लागत आहे. त्यातच पुन्हा लस येईल की नाही, अशी भीती पुसदकरांना सतावत असल्याने नागरिक दररोज गर्दी करीत आहेत. परिणामी, गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी गर्दीला नियंत्रित केले.
बॉक्स
आरोग्य केंद्रातही लसींचा तुटवडा
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातही कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेलाही लस मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना परत जावे लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून नागरिक केंद्र आणि उपकेंद्राच्या चकरा घालत आहेत.