वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण
पांढरकवडा : शहरातील रस्त्याकडेच्या अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात बेशिस्तपणा वाढला असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे या मार्गावरून साधे चालणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
पांढरकवडातील बँकेत ग्राहकांची गर्दी
पांढरकवडा : शहरात बँकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीयीकृत बँका, नागरी संस्था, पतसंस्था, मल्टिस्टेट बँका या सर्वच ठिकाणी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. परंतु, काही बँकेत ग्राहक मास्क घालणे, सोशल डिस्टन्स पाळणे, आदी नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक बँकांमध्ये सॅनिटायझरची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
धोकादायक झाड तोडण्याची मागणी
वणी : वणी ते घोन्सा मार्गावरील मोहोर्ली गावाजवळ असलेले एक मोठे झाड रस्त्याच्या दिशेला झुकले आहे. त्यामुळे हे झाड केव्हा कोसळेल, याचा काही नेम उरलेला नाही. अनेकदा पाऊस आल्यास नागरिक याच झाडाखाली थांबतात. त्यामुळेही अपघाताचा धेाका बळावला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हे धोकादायक झाड तोडावे, अशी मागणी केली जात आहे.