लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी १२ पासून सोमवारी मध्यरात्री १२ पर्यंत असे चार दिवस सलग शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. पुढील तीन दिवस काहीच मिळणार नसल्याने शुक्रवारी सकाळपासूनच यवतमाळ शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तुंबळ गर्दी झाली. दुपारचे १२ वाजत असूनही किराणा दुकानांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पोलिसांच्या भीतीने अखेर दुकानदारांनी शटर डाऊन केल्याने काहींना रिकाम्या हाताने परतावे लागले.रविवार, २६ एप्रिल रोजी अक्षय तृतियेचा सण आहे. त्याचे मडके, पत्रावळी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. तीन दिवसांचा बंद लक्षात घेता कित्येकांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजतापूवीर्पासूनच आपली दुकाने उघडली होती. यवतमाळात गांधी चौक, दत्त चौक, आर्णी नाका, मारवाडी चौक, छोटी गुजरी य Yभागात खरेदीसाठी गर्दी झाली. जीवनावश्यक साहित्याची खरेदी करताना नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची भीती, सोशल डिस्टन्सिंग याचाही विसर पडला. तीन दिवस बंद असल्याने पोलिसांनीही या गर्दीकडे काहिसे दुर्लक्ष केले. परंतु दुपारी १२ वाजताच पोलिसांनी वाहनातून फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. १२ नंतर शहरातील रस्त्यांवर पुन्हा सामसूम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुढील तीन दिवस केवळ दवाखाने, मेडिकल सुरू राहणार आहे. दुधाच्या दुकानांना सकाळी व सायंकाळी ६ ते ८ या दोन तासांची सवलत देण्यात आली आहे. शुक्रवारच्या बाजारपेठेतील गदीर्ने मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.