टपावरून प्रवास : पोलिसांसह परिवहन विभागाचेही दुर्लक्ष, अपघाताची कायम भीतीपुसद : पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीने आजमितीला कळस गाठला आहे. शहरात नव्हे तर ग्रामीण भागातही अवैध वाहनांद्वारे जीवघेणा प्रवास जनमाणसांचे जीवन धोक्यात आणू पाहत आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पुसद शहरातील परिस्थिती यापेक्षाही विदारक आहे. पुसद तालुक्यात सध्या अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा जेवघेणा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. स्वाभाविकच पुसद शहरही याला अपवाद नाही. शहरातील शिवाजी चौक, गांधी चौक, बस स्टँड परिसर, मामा चौक, पूस नदी परिसारतून अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. वाहनाची क्षमता व परिवहन विभागाने दिलेल्या परवान्यापेक्षा दुप्प्ट, तिप्पट वेळ प्रसंगी चौपट प्रवासी कोंबून सदर अवैध प्रवासी वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. शहरात पोलीस प्रशासनाने वाहतूक पोलीस नियुक्त केले आहेत. विस्कळलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी या पोलिसांनी पार पाडावी. अशी त्यांच्याकडून जनतेची प्रामाणिक अपेक्षा असते. अवैध प्रवासी वाहतुकीकडून मिळणाऱ्या खिरापतीत शहर वाहतूक शाखेचे योगदान महत्वाचे आहे. सोबतच जिल्हा वाहतूक शाखेचाही यामध्ये खारीचा वाटा आहे. शहर व ग्रामीण वाहतूक पोलिसांची अवैध वाहतुकीवर सैल झालेली पकड पोलीस अधीक्षकांसमोर आव्हान उभी करणारीच असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)प्रवासी म्हणतात, एसटी नाही जावे कशाने?राज्य परिवहन महामंडळाने कमी उत्पन्नाच्या मार्गावरील बसफेऱ्या परिणामी प्रवाशांना जाण्यासाठी बसच मिळत नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक थांब्यावर तासंतास बसची प्रतीक्षा करतात. परंतु बस येत नसल्याने नाईलाजाने शेवटी खासगी वाहनाने जावे लागते. पुसद तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरळीत करण्यासाठी अनेकदा परिवहन महामंडळाला नागरिक विनंती करतात. परंतु या मार्गावरील वाहतूक सुरळीत होत नाही. तसेच अनियमित बसफेऱ्यांचाही फटका बसतो.
अवैध प्रवासी वाहतुकीने गाठला कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 1:15 AM