शहर व तालुक्यात कोरोना वाढत आहे. परिणामी कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहर व श्रीरामपूर, काकडदाती, धनकेश्र्वर, शेंबाळपिंपरी, बेलोरा, जांब बाजार, वरूड, गायमुखनगर या आठ ग्रामपंचायत क्षेत्रात ३ ते ८ मार्चच्या मध्यरात्रीदरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या कालावधीत सर्वप्रकारची जीवनाश्यक दुकाने, किराणा, स्वस्त धान्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. केवळ बँकेचे कर्मचारी त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करू शकतील, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने एटीएम, फोन-पे, गुगल-पे व ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू न शकणार्यांना मात्र बँका बंदचा त्रास होत आहे. वैद्यकीय शिक्षणासाठीच्या शेवटच्या फेरीत हवे असलेले महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश पक्का करण्यासाठी आवश्यक असलेला डीडी काढून ७ मार्चपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात रक्कम असली, तरी बँकांचे आर्थिक व्यवहार बंद असल्याने डीडी कसा काढावा?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डीडी विहित मुदतीत महाविद्यालयात जमा न केल्यास दोन वर्षे रात्रंदिवस मेहनत करून डाॅक्टर होण्याचे पाहिलेले स्वप्न भंग होते की काय, असाही प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडला आहे. अनेक व्यावसायिकांनी खरेदी केलेल्या मालापोटी आधीच होलसेलरला चेक दिले असून, घरी रक्कम असूनसुद्धा खात्यात टाकता येत नसल्याने दिलेले चेक बाऊन्स होऊन आर्थिक भुर्दंड बसण्याची भीती त्यांना सतावत आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या व वेळेवर आजारी पडलेल्या रुग्णांजवळ नगदी पैसे नसल्याने खासगी रुग्णालयातील उपचार व औषधोपचार कसे करावे, असा प्रश्न भेडसावत आहे. यापूर्वीच्या कडक लाॅकडाऊनमध्ये बँकांचे व्यवहार तीन वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते. परंतु यावेळी संपूर्ण व्यवहारच बंद ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे बँकेचे व्यवहार जीवनावश्यक बाब समजून सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
बॉक्स
श्रीरामपूर येथील एका विद्यार्थिनीचा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, अकोला येथे बीएमएससाठी नंबर लागला आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी ७ मार्चपर्यंत डीडी जमा करण्याचे महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. तिचे पालक श्रीरामपूर येथील बँकेत डीडी काढण्यासाठी गेले. त्यांना ७ मार्चपर्यंत सर्व व्यवहार बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खात्यात पैसे असूनसुद्धा डीडी काढण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे पालक अनिल देशमुख यांनी सांगितले.