लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबित एसटीचा प्रवास कायम सुरू ठेवला आहे. खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न कमी असल्याने परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतनही अल्प प्रमाणात देते. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हातात पडणारी पेन्शनही अपुरीच असते. पूर्वी १२०० रुपये पेन्शन मिळत होती. आता तीन ते साडेतीन हजारांपर्यंत ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या हातात पडत आहे. मिळणारी पेन्शन आणि वाढती महागाई याच्यात कुठलाच ताळमेळ बसत नाही. यामुळे निवृत्तीनंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक हाल होतात. या संदर्भात वाढीव वेतनानुसार पेन्शन मिळावी म्हणून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सर्वांना अधिक पेन्शन मिळण्याची आशा आहे.
नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही फरफट
केंद्र शासनाच्या एम्प्लाॅईज पेन्शन योजनेमधून राज्य परिवहन महामंडळाचे पेन्शन अदा करण्यात येते. मिळणारे पेन्शन खर्चालाही न पुरणारे आहे. या पैशात काहीच होत नाही. १२०० ते ३५०० पर्यंत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत आहे. - अविनाश राजगुरे
सध्याच्या स्थितीत कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन परवडणारी नाही. हातात पडणारे पैसे पाहिले तर त्यातून काहीच होत नाही. उलट सेवानिवृत्तीनंतर आजारपणावर सर्वाधिक खर्च होतो. अशा परिस्थितीत मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे.- मनिष बिसेन
निवृत्तीनंतर सर्वाधिक हालएसटी कर्मचाऱ्यांचे नोकरीत असताना अल्पवेतन कुटुंब चालविण्यासाठी अवघड ठरते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांना तीन हजार रुपयांची पेन्शन हातात पडते. यात काहीच होत नाही. - संजय जिरापुरे, अध्यक्ष,महाराष्ट्र मोटर्स कामगार फेडरेशन
भविष्य निर्वाहनिधी वळतायवतमाळ विभागात परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्यूईटी फंड तात्काळ देण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या तरी कुणाचीही थकबाकी नाही. दर महिन्याला वेतन अदा होते.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक