लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : संपूर्ण तालुक्यासह शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती व धास्ती निर्माण झाली आहे. या बाबीचा गैरफायदा उचलत व्यावसायिकांकडून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक केली जात असल्याचे समोर आले आहे. एन-९५ मास्कच्या नावाखाली बोगस मास्कची चढ्या दराने विक्री करून नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष पाहता संशयाचे धुके निर्माण झाले आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूचा शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील रूग्णांच्या वाढत्या संख्येपाठोपाठ आता नगरपालिका क्षेत्रातही कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये धास्ती व भीतीचे वातावरण पसरले आहे. सहाजिकच पर्यायी उपाययोजना करण्यात नागरिकांचा कल दिसून येत आहे. घराबाहेर निघताना तोंडाला मास्क लावणे जिल्हा प्रशासनाने व नगरपालिका प्रशासनाने अनिवार्य केल्यामुळे नागरिकांचा ओढा उच्च दर्जाच्या मास्क खरेदीकडे असल्याचे दिसत आहे.या सर्व बाबींचा गैरफायदा शहरातील व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. शासनाने प्रमाणित केलेल्या एन-९५ मास्कसारख्याच हुबेहुब बनावट मास्कची विक्री करून ग्राहकांची मोेठ्या प्रमाणावर आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. मास्क वापरणे अनिवार्य झाल्यामुळे महिला व लहान मुलांचा ओढा रंगबिरंगी मास्क खरेदी करण्याकडे आहे. पांढरकवडा येथील बाजारपेठेत यामध्ये अवघ्या ३० रूपयांपासून ते ७० रूपयांपर्यंत विविध रंगांचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.प्रशासकीय यंत्रणांचा कानाडोळा२०० रूपयात ट्रिपल लेअर मास्क शासनाने प्रमाणित केलेल्या एन-९५ मास्कची यापूर्वी केवळ मेडिकल स्टोअर्समधून विक्री केली जात होती. आता सरसकट जनरल स्टोअर्स, किराणा दुकानांमध्येही अशा प्रकारचे नानाविध मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये २०० रूपयात ट्रिपल लेअर मास्कची विक्री केली जात आहे. या मास्कच्या दर्जाबद्दल संबंधित विक्रेत्याला विचारणा केली असता, त्याने असमर्थता व्यक्त केली. शहरात एन-९५ च्या नावाखाली बनावट व दर्जाहीन मास्कची खुलेआम चढ्या दराने विक्री केली जात आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना सातत्याने आवाहन करणाऱ्या प्रशासनाचे या आर्थिक लुटीकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे.