लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड/दिग्रस : लॉकडाऊनच्या काळात वीज वितरणने ग्राहकांना छापिल बिले दिली नाही. आता तीन महिन्यानंतर बिल दिले जात आहे. ही बिले बघून पुसद, उमरखेड, दिग्रस तालुक्यातील ग्राहकांना शॉक बसत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने लॉकडाऊन होता. आता काही प्रमाणात सूट मिळाली. वीज वितरणने मीटर रिडींग न घेताच ग्राहकांना तीन महिन्यांचे सरासरी बिल दिले. हे बिल बघून ग्राहकांचे डोळे विस्फारत आहे. ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प पडल्याने अनेक जण बेरोजगार झाले. सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले. परिणामी तीन महिन्यांच्या वीज बिलात काही प्रमाणात सूट मिळेल, अशी ग्राहकांना अपेक्षा होती. मात्र वीज कंपनीने सरासरी देयक देऊन ग्राहकांनाच शॉक दिला.वीज वितरणने स्वत:हून मीटर रिडींगचे छायाचित्र घेऊन कंपनीच्या पोर्टलवर देयकाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता छापिल बिले हाती पडताच ग्राहकांना शॉक बसत आहे. देयकावर दर्शविलेला वीज वापर आणि मीटरवरील रिडींगमध्ये तफावत आहे. त्यामुळे वीज वापर पाहून बिले द्यावी, अशी मागणी पुसदचे धनंजय सोनी यांनी केली.उमरखेडमध्ये ग्राहकांची होतेय कोंडीउमरखेडमध्येही ग्राहकांची कोंडी झाली. याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अॅड. विलास देवसरकर यांनी तक्रारीतून समस्यांना वाचा फोडली. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्याने घरातील विजेची उपकरणे बिघडली. अनेकांचे टीव्ही, मिक्सर, फ्रिज आदींचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे मोटारपंप जळाले. त्यामुळे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी केली. मात्र वीज वितरणने देयक बरोबरच असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यात कुठेही घरातील वीज उपकरणे जळाली व मोटापंप जळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचेही स्पष्ट केले.दिग्रस ग्राहक पंचायतचे वीज वितरणला निवेदनदिगस येथील ग्राहक पंचायतीने वीज वितरणला निवेदन देऊन बिलाचे हप्ते पाडून देण्याची मागणी केली. लॉकडाऊनमध्ये अनेकांची बिलाचा भरणा केला नाही. अशांकडे बिलाची रक्कम जास्त आहे. त्यांना बिल भरण्यासाठी दोन ते तीन हप्ते पाडून द्यावे, अशी मागणी उपविभागीय वीज वितरण कार्यालयाचे अधीक्षक संजय धावडे यांच्याकडे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रा.मतीन खान, सुनील हिरास यांनी एका निवेदनातून केली आहे.