यवतमाळ : सोन्याच्या दरात महिनाभरात तब्बल अडीच हजार रुपयाने घसरण झाल्याने सराफा बाजारात ग्राहक वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. खरेदीदारांना दर घसरण्याची तर मोडणार्यांना तेजीची प्रतीक्षा आहे. सध्या सराफा बाजारात लग्नाची खरेदी करणार्या ग्राहकांचीच गर्दी दिसत आहे. मे महिन्यात सोन्याच्या झळाळीला उतरती कळा लागली आहे. १ मे रोजी यवतमाळच्या बाजारात ३0 हजार ६00 रुपये प्रती तोळा असलेले सोने ३0 मे रोजी २७ हजार ९00 रुपयावर येऊन स्थिरावले. वर्षभरात झालेली ही सर्वात मोठी घसरण होय. सोन्याच्या दरात घसरण व्हायला लागल्याने सुरुवातीला सोने मोडणार्यांची गर्दी सराफा बाजारात दिसत होती. २९ हजार रुपयांच्या भावात सोने विकणारे त्यावेळी फायद्यातही राहिले. मात्र २७ हजार ५00 ते २८ हजाराच्या दरम्यान सोने मोडायला परवडत नसल्याने तेही थांबले आहे. अवघ्या आठ दिवसात सोने १२00 रुपयाने खाली आले आहे. तर खरेदीदारांना सोन्यात आणखी घसरण होण्याची प्रतीक्षा आहे. सोन्यात होणार्या चढउतारामुळे सोन्यात गुंतवणूक थांबली आहे. गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणार्यांना २६ हजार रुपये प्रति तोळा सोन्याचे दर होण्याची प्रतीक्षा आहे. यवतमाळच्या सराफा बाजारात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र सोन्याचे दर घसरत असल्याने ग्राहकांनी सावध भूमिका घेतली आहे. दिवाळीत सोन्याचे दर प्रति तोळा ३१ हजार रुपयांवर गेले होते. मे महिन्यात सोन्याच्या झळाळीला उतरती कळा लागली आणि ग्राहक वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. यवतमाळ सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सारंग भालेराव म्हणाले, सोन्याच्या दरात असलेली ही घसरण साधारणत: १५ दिवस राहील. त्यानंतर एक हजार ते १२00 रुपये दरवाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या बाजारात खरेदीदार आणि मोडणारे सोन्याच्या दरावर लक्ष ठेऊन आहे. (नगर प्रतिनिधी)
सराफा बाजारात ग्राहकांचे ‘वेट अँन्ड वॉच’
By admin | Published: June 02, 2014 1:48 AM