हंसराज अहीर : कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिले प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यवतमाळ : यवतमाळ व यवतमाळ लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, कोरपना, जिवती व राजुरा या भागात डाळीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या दाळीला चांगला भाव मिळवून देण्यासाठी यवतमाळ येथे दाळ क्लस्टर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी चंद्रपूर येथे शनिवारी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला यवतमाळ कृषी उपसंचालक पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक इंगळे, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी संजय पवार, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, आत्माचे प्रभारी प्रकल्प संचालक अशोक मगत व जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात दाळीचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येवून त्यांना जास्तीत जास्त उत्पादनात कसे वाढेल यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नाही, अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करुन पाठवावे, असेही ते म्हणाले. हळद, मिरची, हरभरा, कापूस इत्यादी पिके ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जातात, त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या उत्पादनात कशी वाढ होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना बि-बियाणांचे वाटप करण्यात आले, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जावून त्यांच्या पिकांची पाहणी करुन त्यांनासुद्धा काही मार्गदर्शन करता येईल का, यावरसुद्धा भर दिला पाहिजे, असे अहीर यांनी सांगितले. त्या शेतकऱ्यांना खताचे वाटपसुद्धा करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून फळबाग, भाजीपाला, दूधव्यवसाय व मधमाशी पालनासारखा जोडधंदा करण्यासाठी प्रोस्ताहित करण्यात यावे. तो जोडधंदा करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना सर्व प्रकारची मदतसुद्धा कृषी विभागातर्फे देण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय असून त्यांनी विद्युत विभागाकडे विद्युत मिटरसाठी पैसे भरले आहे. परंतु त्यांना अद्यापही विद्युत मीटर मिळाले नसेल, अशा शेतकऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करुन त्यांना विद्युत मीटर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे, असेही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. जिल्ह्यात ज्या गावात नर्सरीसाठी खुली जागा ठेवण्यात आलेली आहे, अशा जागेवर भाजीपाला व फळबाग निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
यवतमाळ येथे डाळ क्लस्टर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 12:58 AM