यवतमाळ : वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच परिणाम डाळींच्या किमतीवर दिसून येत आहे. डाळींच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या सोबतच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. भाजीपाल्याच्या दरात मात्र तेजी आहे. परंतु इतर वस्तुंची किंमत कमी झाल्यामुळे गृहिणींचे बजेट काही प्रमाणात का होईना सावरले आहे. आकाशाला भिडणाऱ्या तूर डाळीच्या किमतीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. यामुळे केंद्र शासनाने मोठया प्रमाणात डाळीची आयात केली आहे. याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे. डाळीचे दर किलो मागे २० ते ३० रूपयाने कमी झाले आहेत. तर सिलिंडरचे दर ५५ रूपयाने घसरले आहेत. भाजीपाल्याच्या किमती किंचित वधारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तूर डाळींचे दर १६० रूपयांवर पोहचले होते. हे दर आता १०० ते ११० रूपयांपर्यंत खाली आले आहेत. यामध्ये ४० ते ५० रूपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. सव्वा नंबर तूर डाळ ११० रूपयांवरून ९५ ते ९८ रूपये किलोवर आली आहे. चनाडाळ ११० रूपयांवरून ९० रूपयांपर्यंत खाली आली आहे. उडदाची डाळ १४५ रूपयावरून १२० रूपयांपर्यंत घसरली आहे. मुगडाळ ८० रूपयांवरून ७५ रूपयापर्यंत खाली आली आहे. मसूर डाळ ७५ रूपये आहे. वटाना ४० रूपये, चना ७० रूपये, बरबटी ५६ रूपये, ज्वारी १८ ते २० रूपये किलो आहे. (शहर वार्ताहर) चढ-उतार कायम काही भाज्यांच्या किमती घसरल्या आहेत. टमाटरचे दर १० रूपये किलो व काकडी २० रूपये किलो आहे. वांग्याचे दर ५० रूपये किलोच्या घरात पोहचले आहेत. भेंडी, बरबटी, शेपू, मुग आणि कारल्याचे दर ४० रूपये किलोच्या घरात आहे. गव्हार, दोडके, ढेमस, सांभार आणि गवार शेंगांचे दर ५० रूपये किलोच्या घरात आहे. फुलकोबी, पालक, अद्रक आणि करवंद यांचे दर ६० रूपये किलोच्या घरात आहे. गुळ व साखरेचा गोडवा महागला बाजारात गुळाच्या आणि साखरीच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली आहे. तर मिरचीचे दर घसरले आहेत. ठोक दरांवर नजर टाकल्यास साखर ३५ रूपयांवरून ४० रूपये किलो तर गुळ ४० रूपयांवरून ५० रूपये किलोच्या घरात पोहचला आहे. मिरचीचे दर १८० रूपयांवरून १६० वर घसरले आहे.
डाळ उतरली, भाजी तेज
By admin | Published: August 18, 2016 1:16 AM