मारेगाव तालुक्यात सिंचनाच्या दृष्टिकोनातून नवरगाव मध्य प्रकल्प आणि बेंबळा धरणाचे मोठे कालवे हजारो हेक्टर शेतातून खोदण्यात आले आहे, तर नरसाळा, महागाव, शिवनाळा, म्हैसदोडका, पेंढरी, वाघदरा आदी ठिकाणी लघू प्रकल्पाची निर्मिती करीत कालव्याची निर्मिती केली आहे. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी कालवा खोदकाम करताना शेतकऱ्यांचा आणि ज्या शेतात कालवा खोदला आहे, त्या शेताचा कसलाही विचार न करता कालवा खोदण्याचे ढोबळ काम केल्याचे दिसून येते. त्यामुळे चुकीच्या कामामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या कालव्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचे रस्तेच बंद करून टाकले. १० ते १५ फूट खोल कालव्यातून इकडून तिकडे कसे जावे हा प्रश्न आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतात जाण्याचे मार्ग बंद झाले आहे. तर कालवा खोदकामामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होत आहे, तर काही शेतकऱ्यांच्या शेताच्या मधातून हा कालवा गेल्याने चांगल्या शेतीचे दोन भाग झाले आहे. कालवा खोदकाम करताना शेतातील पावसाळी पाणी वाहून जाण्याच्या अनेक वर्षांपासून असलेल्या नाल्या बंद झाल्या. त्यामुळे शेतातील पाणी वाहून जायला जागा नसल्याने कालव्याच्या भिंतीला हे पाणी साचून राहात आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यासोबतच शेताचेही नुकसान होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार केल्यास कोणीही दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी आपण होऊन काही उपाययोजना केल्यास कार्यवाहीची भीती दाखविल्या जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी या समस्येने त्रस्त आहेत.
बॉक्स : महिला शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा
टाकळखेडा शिवारातील महिला शेतकरी सविता दरेकर यांच्या शेतात जाण्याचा मार्ग नवरगाव प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या कालव्यामुळे बंद झाला. पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करूनही रस्ता बनवून भेटला नाही. शेवटी त्यांनी स्वखर्चाने हजारो रुपये खर्च करून रस्ता बनविला. आता हा रस्ता मोकळा करा, असा तगादा पाटबंधारे विभागाने लावला असून, कार्यवाहीची भीती दाखविली जात आहे. शेतात कसे जावे? हा प्रश्न असल्याने कार्यवाही केल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती सविता दरेकर यांनी दिली.