यवतमाळ : जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. यातून प्रतिसेकंद ४० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जलसंचय वाढला आहे. सध्या या प्रकल्पात ८१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, लोवर वर्धा प्रकल्पाचेही तीन दरवाजे ३० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. यातून प्रतिसेकंद ७६.८६ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रमुख धरणातील पाणीसाठा वाढला असून बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील चारही प्रमुख प्रकल्पात लक्षणीय पाणीसाठा होता. अरुणावती प्रकल्पात मागील वर्षी ८६.६८ टक्के पाणी होते. यंदा या प्रकल्पात ८४.११ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बेंबळा प्रकल्पही तुडुंब आहे.
या प्रकल्पात ४५.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर इसापूर प्रकल्पात ६५.४२ टक्के आणि पूस प्रकल्पात ८२.९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील इतर मध्यम व लघु प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा असून मोठा पाऊस झाल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सेवानिवृत्त शिक्षकाचा अद्यापही पत्ता नाही
अकोला बाजार : गावाजवळून वाहणाऱ्या नदीत वाहून गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचा महिना लोटूनही पत्ता लागलेला नाही. विलास सुखदेव खरतडे (६०, रा. अकोला बाजार) असे त्यांचे नाव आहे. त्यांची शेती अकोला बाजार येथे नदीकाठावर आहे. २२ जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ते दुचाकीने शेतात गेले होते. नदीला पाणी वाढत असल्याने दुचाकी झाडाला बांधत होते. त्याचवेळी पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. परंतु अजूनही त्यांचा पत्ता लागलेला नाही.
बचाव पथकाची नदीपात्रात दिवसभर शोधमोहीम
अकोला बाजार / कुन्हा (तळणी) : सर्वत्र नागपंचमीचा सण साजरा होत असताना बोरगाव पुंजी या गावात पूजेसाठी आंघोळ करताना युवक अडाण नदीत वाहून गेला. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. योगेश सुभाष राठोड (१८, रा. बोरगाव पुंजी) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
योगेश हा नागपंचमीनिमित्त पूजा करण्यासाठी अडाण नदीकाठावर असलेल्या उत्तरेश्वर शिवमंदिरात दूध व पूजेचे साहित्य सोबत घेऊन गेला होता. तत्पूर्वी तो लगतच्या अडाण नदीत स्नान करण्यासाठी गेला. पाय घसरून पुराच्या प्रवाहात गटांगळ्या खात वाहून गेला. या प्रकाराची माहिती त्याठिकाणी उपस्थितांनी गावात दिली. गावातील काही जणांनी पुरात पोहून योगेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती लगेच प्रशासनाला देण्यात आली. परंतु शोधकार्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यवतमाळहून शोधपथक पोहोचत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला. दुपारी २:३० वाजतापासून शोधकार्य सुरू करण्यात आले. आण येथील तहसीलदार परशुराम भोसले, तलाठी सुनील राठोड, बिट जमादार सुशील शर्मा आदी घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी ६ वाजतापर्यंत शोधमोहीम राबविली.
जिल्ह्यात बरसला वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस
यावर्षीच्या हंगामामध्ये पावसाने सर्व विक्रम मोडीत काढत मासिक सरासरीच्या ११५ टक्के पावसाची नोंद केली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के आहे. जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरीदेखील ओलांडली आहे. त्यामध्ये आर्णी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १३९ टक्के पाऊस कोसळला आहे तर यवतमाळ तालुक्यात १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नेर, पुसर आणि उमरखेडमध्ये वार्षिक सरासरीच्या उंबरठ्यावर पाऊस ठेपला आहे.