आरोग्य विभाग : पावसाळ्यातील प्रतिबंधक उपाययोजनांवर भर यवतमाळ : पावसाळ्याची जेमतेम सुरुवात असल्याने डेंग्यूचा किंवा अन्य साथरोगांचा सध्या कुठेही उद्रेक नाही. मात्र आॅगस्टनंतर डेंग्यूसारखे आजार डोके वर काढण्याची भीती आरोग्य विभागाला आहे. त्यामुळेच या विभागाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे. उपाययोजनांबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. डॉ. राठोड म्हणाले, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथरोगांवर आरोग्य खात्याचे संपूर्ण लक्ष आहे. डेंग्यूची राज्याबाहेर चर्चा असली तरी महाराष्ट्रात अद्याप त्याचा कुठेही उद्रेक झाल्याचे ऐकिवात नाही. जिल्ह्यात साथरोगाचे मोठे उद्रेक नाही. परंतु आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यातून साथरोगांचा जन्म होतो. अनेक ठिकाणी साथीच्या आजाराचे मोठे उद्रेक होतात. आॅगस्टनंतर डेंग्यूसारखे आजारही डोके वर काढण्याची अधिक शक्यता असते. याबाबी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आतापासूनच विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या माध्यमातून अशा साथरोगांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत आहे. नदी-नाल्याच्या काठावरील पूरग्रस्त गावांवर अधिक लक्ष दिले जात आहे. त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिक प्रमाणात औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुरामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता पाहता घरोघरी मेडिक्लोन हे लिक्वीड आरोग्य यंत्रणेबाबत पोहोचविले जात आहे. साथरोगांच्या उद्रेकाच्या वेळी जिल्ह्यात कुठेही उपकरणे, यंत्रणा, रुग्णवाहिका, औषधी याची अडचण निर्माण होणार नाही, याबाबतची खबरदारी आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे डॉ. के.झेड. राठोड यांनी सांगितले. साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी कंट्रोल रुम सुरू करण्यात आल्याचेही राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आॅगस्टमध्ये डेंग्यूचा धोका
By admin | Published: July 17, 2016 12:39 AM