२५ टक्के प्रवेश : वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन प्रक्रिया यवतमाळ : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार, २५ टक्के राखीव कोट्यातील प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी जाणीवपूर्वक नोंदणी टाळणाऱ्या शाळांची मान्यता तातडीने काढून घेण्यात येईल, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खासगी शिक्षण संस्थेमध्ये दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याची आरटीईमध्ये तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतील २५ टक्के जागा अशा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. गेल्यावर्षीपासून राखीव प्रवेशाची प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील १७९ खासगी शाळांनी या प्रक्रियेत नोंदणी केली होती. १८८६ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यात ८८० विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत प्रवेश घेतला. २०१७-१८ या नव्या शैक्षणिक सत्रासाठी आता जिल्ह्यातील शाळांची नोंदणी सुरू आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी शाळांना मुदत देण्यात आली आहे. परंतु, या काळात नोंदणी करण्यासाठी शाळांनी टाळाटाळ केल्यास किंवा नोंदणी करूनही पुढे राखीव जागेवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास कुचराई केल्यास कारवाई केली जाणार आहे. अशा शाळांची मान्यता तातडीने रद्द करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिले आहे. २५ टक्के राखीव प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यात ३ फेब्रुवारीपर्यंत पात्र शाळांची आॅनलाईन नोंदणी होणार आहे. ५ ते २१ फेब्रुवारी या काळात पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरावा लागेल. २७ आणि २८ फेब्रुवारीला पहिली सोडत काढली जाईल. १ ते ९ मार्च या काळात पालकांना मिळालेल्या शाळेत प्रत्यक्ष जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. यानंतरही काही जागा रिक्त राहिल्यास त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी २९ एप्रिलपर्यंत एकूण चार वेळा सोडत काढण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
राखीव प्रवेश टाळणाऱ्या शाळांची मान्यता धोक्यात
By admin | Published: January 21, 2017 1:29 AM