यवतमाळ : यवतमाळ शहरात गेल्या काही महिन्यांपासून अगदी दरोड्याच्या स्टाईलने धाडसी घरफोड्या होत आहे. चोरट्यांची संख्या कमी असल्याने किंवा वेळप्रसंगी कमी दाखवून दरोड्याची तीव्रता चोरीत दडपली जात आहे. मालमत्तेच्या प्रकारातील ही वाढती गुन्हेगारी म्हणजे पोलिसांकडून व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचा हा परिणाम मानला जातो. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या घरी झालेल्या अडीच लाखांच्या चोरीने पोलिसांची रात्रगस्त, कर्तव्यदक्षता, गुन्हेगारी वर्तुळातील नेटवर्क, डिटेक्शन, एलसीबी-डीबीतील माहितगार कर्मचारी, अधिकाऱ्यांची तत्परता, प्रशासनाचा अनुभव-अभ्यास व पकड आदी बाबी ऐरणीवर आल्या आहे. यानिमित्ताने गेल्या काही महिन्यात यवतमाळ शहरात घडलेल्या आणि अद्याप उघडकीस न आलेल्या चोऱ्यांचीही चर्चा होऊ लागली आहे. मांगुळकरांच्या घरापासून २०० मीटर अंतर परिसरात यापूर्वी दोन मोठ्या घरफोड्या झाल्या आहेत. यातील एक तर भरदिवसा आणि भररस्त्यावरील घरात झाली आहे. काळे ले-आऊट परिसरात एकाच वेळी सहा घरे फोडण्यात आली होती. पिंपळगाव परिसरातही शिक्षकाला बांधून ठेऊन चोरी झाली होती. या सर्व घरफोड्या या दरोड्याच्या स्टाईलने केल्या गेल्या होत्या. पाठोपाठ घरफोड्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस चोऱ्या-घरफोड्या- गुन्हेगारी रोखतील, घडलेला गुन्हा उघडकीस आणतील, याबाबत आता सामान्य नागरिक साशंक असल्याचे दिसून येते. गेल्या काही महिन्यांपासून प्रॉपर्टीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पर्यायाने गुन्हेगारी वर्तुळात पोलिसांची दहशत नसल्याचे दिसून येते. त्याला थांबलेली प्रतिबंधात्मक कारवाई आणि उपाययोजना कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. जिल्हा पोलीस अधीक्षक सुरेश मेखला यांच्या कार्यकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात भर दिला गेला होता. त्यांनीच चार्ली पथक, कमांडो ही संकल्पना राबविली. त्यासाठी पोलीस मुख्यालयातील नव्या दमाचे कर्मचारी दिले. त्यांना वॉकीटॉकी पुरविल्या गेल्या. शहराचा नकाशा बनवून गस्तीचे पॉर्इंट निश्चित केले गेले. तोच पॅटर्न पुढे रंजनकुमार शर्मा, संजय दराडे यांनी सुरू ठेवला. उलट त्याला ‘अपग्रेड’ही केले. परंतु गेल्या काही दिवसांपासून हा पॅटर्न थंडावल्याचे दिसते. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. प्रतिबंधात्मक कारवाईच होत नसल्याने गुन्हेगारही पोलिसांना भीक घालत नाही. गुन्हेगार ताब्यातच नसल्याने त्याच्याकडून कोणतीच खबर पोलिसांना मिळत नाही. शहरातील सध्याची वाढलेली गुन्हेगारी या थंडावलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचाच परिणाम मानला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) डीबी-एलसीबीत माहीतगार पोलीस कर्मचाऱ्यांची वाणवा ४डिटेक्शनबाबतही पोलिसांची बोंबाबोंब आहे. शहर, वडगाव रोड पोलीस ठाण्यातील डीबी सारखीच अवस्था स्थानिक गुन्हे शाखेची झाली आहे. तेथे खांदेपालट झाला असला तरी सध्या मटका-जुगाराच्या धाडीतच तेथील यंत्रणेची एनर्जी वेस्ट होत असल्याचे दिसते. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये सुमारे ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. परंतु त्यात गुन्हेगारी वर्तुळात नेटवर्क असलेल्यांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याऐवढी आहे. त्यातही बहुतांश कर्मचारी हे वर्षानुवर्षे जिल्हा मुख्यालयीच काम केलेले आहेत. ग्रामीणच्या गुन्हेगारी जगताचा त्यांना अभ्यास नाही. कोणतीही घटना घडली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे एवढ्यापर्यंतच त्यांची मर्यादा आहे. गुन्हेगारी वर्तुळात दाखल झालेल्या नव्या चेहऱ्यांची एलसीबीतील या यंत्रणेला ओळख असण्याची शक्यता कमीच आहे. पोलीस महािनरीक्षक केव्हा उगारणार कारवाईचा बडगा ? ४मोठ्या प्रमाणात चोऱ्या-घरफोड्या होत असताना अधिकाऱ्यांना डिटेक्शनबाबत नेमके मार्गदर्शन होताना दिसत नाही. प्रशासनच तेवढे गंभीर नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. मटका-जुगार धाडी आणि कारवाईचा देखावा यावरच लक्ष केंद्रीत असल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या-घरफोड्या होत असताना अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडूनही कुठेच जाब विचारल्याचे अथवा कारवाईचा बडगा उगारल्याचे ऐकिवात नाही. मुळात महानिरीक्षकांच्या यवतमाळ जिल्ह्यात भेटीच अत्यंत कमी झाल्या आहे.अधिकाऱ्यांचा ‘टाईमपास’४गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुळात ‘डॅशिंग-डेअर्ड’ अधिकाऱ्यांची वाणवा आहे. कुण्या नवीन फौजदार-एपीआयने तसा प्रयत्न केला तरी त्याला तेवढे स्वातंत्र्य मिळत नाही. सुरुवातीलाच त्याचा उत्साह दाबण्याचा प्रयत्न होताना दिसतो. शहरात तैनात अधिकाऱ्यांची खूप काही करण्याची मानसिकता नाही. उलट अनेकांचा ‘टाईमपास’ सुरु असल्याचे दिसून येते. घरफोडीतील एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले आहे. घटनेच्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे. मागील काही दिवसात नियंत्रणात असलेल्या घरफोड्या वाढल्या आहे. आता पोलीस गस्त वाढवून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींच्या हालचाली टिपण्यात येत आहे. - राहुल मदनेउपविभागीय पोलीस अधिकारी
दरोड्याच्या स्टाईलने होत आहेत धाडसी घरफोड्या
By admin | Published: March 15, 2016 4:12 AM