लाच स्वीकारली : चारित्र्य प्रमाणपत्रासाठी लागला डागदारव्हा : चारित्र्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दारव्हा येथील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुुधवारी पोलीस ठाण्याच्या आवारातच अटक केली.बापुराव मैनाजी दोडके (ब.नं. ४१४) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. लोही येथील विशाल तायडे यांनी सावकारी परवान्यासाठी अर्ज केला होता. त्याकरिता चारित्र्याच्या दाखल्याची आवश्यकता होती. या दाखल्यासंबंधीचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत पाठवायचा होता. मात्र त्यासाठी जमादार दोडके यांनी तायडे यांना तीन हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे द्यायचे नसल्याने तायडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यवतमाळ कार्यालयाकडे तक्रार केली. त्यावरून पोलीस उपअधीक्षक नासीर तडवी यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला. दारव्हा पोलीस ठाण्याच्या आवारातील गोपनीय शाखेसमोर पंचासमक्ष लाच स्वीकारताना पोलीस शिपाई दोडके यांना दुपारी अटक करण्यात आली. एसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात अरुण गिरी, अमित जोशी, नीलेश पखाले, अनिल राजकुमार, किरण खेडकर, भारत चिरडे आदींनी ही कारवाई केली. (तालुका प्रतिनिधी)
दारव्हाचा पोलीस शिपाई ‘एसीबी’च्या जाळ्यात
By admin | Published: September 01, 2016 2:32 AM