कर्मचारी विरोधातच : सीईओंची भूमिका ठरणार निर्णायकयवतमाळ : दीर्घ रजेवर असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड रूजू होण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांचा त्यांना असलेला विरोध अद्यापही कायमच आहे. दीड महिन्यांपूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात मोर्चा काढून थेट पोलीस ठाणे गाठले होते. तेथे महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावरून त्यांच्याविरूद्ध गुन्हेही दाखल झाले. तेव्हापासून आरोग्य अधिकारी रजेवर आहे. दरम्यान, त्यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीनही मिळविला. त्यामुळे त्यांची अटक टळली. तथापि अद्याप ते रजेवरच आहे.जिल्हा परिषदेनेही डॉ. राठोड यांच्याविरूद्ध दाखल तक्रारीनंतर ‘विशाखा’ समितीला चौकशीचे आदेश दिले होते. या समितीने या प्रकरणात चौकशी करून अहवाल तयार केला आहे. मात्र या अहवालात नेमके काय दडले आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ आहे. तथापि अहवालात डॉ. राठोड यांच्या विरूद्धच्या तक्रारीत काहीच दम नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याची चर्चा आहे. डॉ. राठोड बुधवारी सायंकाळी रजेवरून आपल्या पदावर रूजू होण्यासाठी ‘सीईओं’कडे पोहोचले होते.याची कुणकुण लागताच डॉक्टरांच्या ‘मॅग्मो’ संघटनेचे पदाधिकारी, सदस्यही तेथे पोहोचले. त्यांनी डॉ. राठोड यांना रूजू करून घेण्यास विरोध दर्शविला. त्यांच्या विरोधानंतर अखेर सीईओंनीही त्यांना रूजू करून घेण्यास चालढकल केली. त्यामुळे डॉ. राठोड यांनी पुन्हा एकदा रजेचा अर्ज सादर करून रजा वाढवून घेतल्याची माहिती प्राप्त झाली. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचललाच नाही. (शहर प्रतिनिधी)
‘डीएचओं’ची रूजू होण्यासाठी धडपड
By admin | Published: September 23, 2016 2:41 AM