आदेशाचा फज्जा : शिक्षक विचारताहेत, एक तारीख कोणती ?यवतमाळ : शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाच वेतन अदा केले जावे, असा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक कर्मचारी अजूनही या आदेशाच्या लाभापासून वंचित आहे. महिन्याची १५ तारीख उलटून गेल्यानंतरही पगार हाती न पडल्याने ‘कोणती एक तारीख?, असा प्रश्न हे कर्मचारी काहीशा उपहासाने विचारत आहेत. वेतनासाठी विलंब होत असल्याने सर्वत्र असंतोष पसरलेला आहे. या बाबत शिक्षकांच्या विविध संघटनांनी वारंवार शासन दरबारी आवाज उठविला. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०१२ पासून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीद्वारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया सुरू केलीे. तरीही अनेक ठिकाणी वेतनासाठी विलंब होण्याचा प्रकार सुरूच आहे. अनेक शिक्षकांना दोन-दोन महिने वेतनासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यांच्या रोषाची दखल घेत शासनाने १३ आॅगस्ट रोजी नवा जीआर जारी केला. त्यानुसार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाच अदा करण्याचे बंधन संबंधित यंत्रणांवर घालण्यात आले. परंतु आता १५ सप्टेंबर उलटून गेल्यानंतरही आॅगस्ट महिन्याचे वेतन अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. खासगी प्राथमिक शाळेच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. यवतमाळ वेतन पथकामार्फत या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येते. वेतन पथकाचे अधीक्षक दीर्घ सुटीवर गेल्यामुळे बऱ्याच शाळांचा जून महिन्याचा पगारही मिळू शकलेला नाही. सप्टेंबर अर्धा संपला असताना अजूनही आॅगस्टच काय पण जुलै महिन्याचेसुद्धा वेतन मिळालेले नाही. सध्या सणासुदीचा कालावधी आहे. त्यामुळे खर्चातही वाढ झालेली आहे. मात्र वेतनच हाती न पडल्याने खासगी शाळांतील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कर्जाचे हप्ते थकले, व्याजाचा भुर्दंडमहिना उलटूनही पगाराची रक्कम न मिळाल्याने अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गृह कर्जाचे हप्ते, एलआयसीचे हप्ते रखडले आहे. हप्ते वेळेत न भरल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर व्याजाचाही भुर्दंड बसणार आहे. सण-उत्सवाच्या काळात त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेने शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.
पगाराची तारीख हुकली
By admin | Published: September 19, 2015 2:28 AM