कोरोनाचे थैमान : यवतमाळसह दारव्हातील वृद्धाचा मृत्यू
यवतमाळ : एकीकडे कोरोना, गेला असे समजून नागरिक बेफिकीर झालेले असतानाच कोरोनाने मात्र पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सोमवारी २१० जणांना धरल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी आणखी २४६ जणांना कोरोनाने पछाडल्याचे निष्पन्न झाले. त्याचवेळी दिवसभरात दोघांचा बळीही गेला.
मंगळवारी दगावलेल्या दोघांमध्ये यवतमाळ शहरातील ७० वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील ८३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, पॉझिटिव्ह आलेल्या २४६ जणांमध्ये १५४ पुरुष आणि ९२ महिला आहेत. यात यवतमाळातील १३२ रुग्ण, दिग्रस ३९, पुसद येथील २५, दारव्हा १७, पांढरकवडा १७, नेर ५, वणी ४, आर्णी ३, बाभूळगाव ३ आणि महागाव येथील १ रुग्ण आहे.
सोमवारी एकूण १ हजार ३३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर १ हजार ९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १ हजार १३८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार ५०१ झाली आहे. २४ तासांत १५८ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १४ हजार ९१३ झाली आहे, तर जिल्ह्यात एकूण ४५० जणांच्या मृत्यूची प्रशासनाने नोंद केली आहे.
सुरुवातीपासून आतापर्यंत १ लाख ५५ हजार ४४ नमुने तपासणीसाठी पाठविले. यापैकी १ लाख ५४ हजार ३०८ अहवाल प्राप्त तर ७३६ अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ३७ हजार ८०७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले आहे.
बाॅक्स
१५८ जण कोरोनामुक्त जिल्ह्यात कोरोना वाढत आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभागही उपचारावर डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे. त्यातून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे. मंगळवारी दिवसभरात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या १५८ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.