संतोष कुंडकरवणी (यवतमाळ) : मारेगाव तालुका वनपरिक्षेत्रातील बोटोणी राऊंडमधील गावालगत असलेल्या अंबोरा नाल्याच्या पात्रात सोमवारी सकाळी पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने वन वर्तुळात खळबळ उडाली आहे. मारेगाव वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघ मृत होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने काही मुले अंबोरा नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते. या मुलांना त्या ठिकाणी मोठ्या आजनाच्या झाडाजवळ नाल्यातील पाण्यात पट्टेदार वाघ मृतावस्थेत पाण्यात तरंगताना आढळून आला.
या मुलांनी याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर हे वन कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. मृत वाघाचे वय अंदाजे तीन ते चार वर्षांचे आहे. वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. यावरून या वाघाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. त्याच्या मानेजवळ जखम आहे. वाघ आजारी असावा आणि त्याला पाण्यातून बाहेर पडता न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.
आठ दिवसांपूर्वी कॅमेऱ्यात कैदवन विभागाने या वनपरिक्षेत्रात ५० कॅमेरे बसविले आहेत. आठ दिवसांपूर्वी या वाघाचे परिसरात वास्तव दिसून आले. हा नर जातीचा वाघ असून दुसऱ्या वाघाशी भांडण झाल्याने तो समुहातून वेगळा झाला असावा. त्याच्याच जखमा त्याचे शरीरावर आहे. तो आजारी असावा आणि पाण्यातून बाहेर पडता न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनपरीक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांनी व्यक्त केला.