लोहारातील सतीश डोईजड खूनप्रकरण : आणखी दोघांच्या सहभागाचा संशययवतमाळ : लोहारा येथील बहुचर्चित सतीश डोईजड याचा खून करून प्रेत जाळल्यानंतर विहिरीत फेकल्याच्या घटनेत आणखी दोघांचा सहभाग असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान मृतदेह सापडलेल्या विहिरीतूनच बुधवारी सतीशची दुचाकी बाहेर काढण्यात आली. लोहारा येथील सतीश डोईजड खूनप्रकरणात बुधवारी पोलीस अटकेतील आरोपींना घेऊन घटनास्थळाच्या तपासणीसाठी गेले होते. सर्वप्रथम या आरोपींनी दारव्हा रोडवरील ढाब्याजवळचे ठिकाण दाखविले. तेथेच मांसाहार करीत असताना सतीश व आरोपी असलेल्या त्याच्या दोन साथीदारांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी सतीशचा मृतदेह जाळलेले एमआयडीसी जंगलातील ठिकाण व सानेगुरुजीनगरातील ज्या विहिरीत सतीशचा जाळलेला मृतदेह व त्याची मोटरसायकल टाकण्यात आली ती सार्वजनिक विहीर दाखविली. या विहिरीतून पोलिसांनी सतीशची दुचाकी बाहेर काढली. त्यामुळे आरोपींनी सांगितलेल्या घटनाक्रमाला दुजोरा मिळाला. अट्टल आरोपीपुढे पोलिसांची कसोटी हा सर्व घटनाक्रम पाहता हे कृत्य केवळ दोघा-तिघांचे असू शकत नाही. यात आणखी एक-दोन जण सहभागी असावे असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने आरोपींची चौकशी केली जात आहे. यातील मुख्य आरोपी हा अट्टल आहे. पोलिसांच्या ‘प्रसादा’लाही तो जुमानत नाही. गुन्ह्याची उकल करताना व त्यातील पुढे आलेल्या दोघांची नावे उघड करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. आता अन्य दोन आरोपींची नावे आरोपींकडून उघड करताना पोलिसांची कसोटी लागणार आहे. एका बीअरने आरोपी बनविले आरोपींनी घटनास्थळ भेटीदरम्यान पोलिसांना कथन केलेल्या घटनाक्रमानुसार, सुरुवातीला दारव्हा रोडवरील एका ढाब्याजवळ हे आरोपी थांबले. तेथेच सतीश व अन्य दोघांनी शिजवून आणलेला मांसाहार केला. तेथेच वाद झाल्याने सतीशला डोक्यात लाकडी बांबूने मारहाण केली गेली होती. त्यात तो बेशुद्ध झाल्याने व प्रकरण शेकण्याच्या भीतीने दोघांनी सतीशला त्याच्याच दुचाकीवर बसवून लोहारा एमआयडीसीतील जंगलात नेले. तेथे त्याच्यावर पुन्हा वार करण्यात आले. दुचाकीमधील पेट्रोल टाकून त्याला जाळण्यात आले. मात्र तो अर्धवट जळाल्याने दोनही आरोपी पायदळ यवतमाळात आले. येथून त्यांनी डिझेल घेतले. केवळ बीअरचे आमिष दाखवून आणखी एकाला सोबत घेतले. एमआयडीसीत जाऊन डिझेल टाकून सतीशला पुन्हा जाळण्यात आले. नंतर त्याचा मृतदेह पोत्यात टाकून व दुचाकी वाहन साने गुरुजीनगरात आणण्यात आले. ऐनवेळी चौसाळ्याचा प्लॅन चेंज वास्तविक हा मृतदेह चौसाळा जंगलात फेकण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र दिवस उजाडल्याने साने गुरुजीनगरातील विहिरीतच मृतदेह व दुचाकी टाकण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी) आरोपी कोठडीत राहूनही खुनाचा पत्ता नाही ! यातील प्रमुख आरोपी साने गुरुजीनगर परिसरात घटनेच्या पहाटे संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आला होता. तो अट्टल गुन्हेगार असल्याची ओळख पटल्याने गस्त करणाऱ्या पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला अटक केली होती. त्याला वडगाव रोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. नंतर वैयक्तिक बॉन्डवर त्याला सोडून देण्यात आले. मात्र नंतर तोच सतीशच्या खुनातील मुख्य आरोपी निघाला. गुरुवारी घटनास्थळ भेटी दरम्यान या आरोपींनी पोलिसांकडे अनेक बाबींचा उलगडा केल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते.
मृतदेहासोबत दुचाकीही विहिरीत
By admin | Published: March 31, 2017 2:20 AM