संतोष कुंडकर
पांढरकवडा (यवतमाळ) : पांढरकवडा वन विभागातील घाटंजी वन परिक्षेत्रातील मांडवा बीटमध्ये २८ जानेवारी रोजी सकाळी तळ्याजवळ एक पट्टेदार वाघिण मृतावस्थेत आढळला होती. मृत वाघिणीला सहा महिन्यांचे दोन बछडे होते. संकटात सापडलेल्या या बछड्यांना वनविभागाने मंगळवारी सकाळी रेस्क्यू करून गोरेवाडा (नागपूर) येथे सुरक्षित रवाना करण्यात आले.
या बछड्यांना शिकार करता येत नव्हती तसेच या परिसरात नर वाघ व बिबट्यांचा वावर असल्याने बछड्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे वनविभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. त्यांना वाचवण्यासाठी पीसीसीएफ वन्यजीव यांच्या आदेशानुसार अमरावती येथील चमूला पाचारण करून दोन्ही बछड्यांना फिजिकली रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले. ९ मार्च ते १३ मार्च दरम्यान ही चमू घाटंजी वनपरिक्षेत्रात यासाठी काम करत होती. याबाबत वनविभागाकडून अत्यंत गोपनियता पाळण्यात आली. १४ मार्च रोजी सकाळी दोन्ही बछड्यांना ट्रँग्यूलाईज न करता ताब्यात घेऊन गोरेवाडा येथे पाठविण्यात आले. यावेळी पांढरकवडा व घाटंजी येथील पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
नैसर्गिक असलेल्या बंदीस्त आवारात होणार संगोपन
आईचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेले व शिकार करण्यास असमर्थ ठरलेल्या बछड्यांना पीसीसीएफ वन्यजीव यांच्या आदेशानुसार रासायनिक अचलीकरण करून पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची तपासणी करून जंगलात सोडण्याआधी मूळ स्थितीतील नैसर्गिक असणाऱ्या बंदिस्त आवारात संगोपन केले जाईल. तेथे नैसर्गिक भक्ष मिळेल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.
जोपर्यंत बछडे शिकार करण्यासाठी प्राण्यांच्या मागावर जात नाही किंवा शिकार करू शकत नाही, तोपर्यंत त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष चमू नियुक्त केली जाणार आहे. बछड्याने केलेल्या शिकारीची नोंद ठेवली जाणार आहे. जंगलात सोडण्यापूर्वी बछड्याने किमान ५० वेळा शिकार केली असावी, त्यानंतर मुख्य वन्यजीव संरक्षक अशा बछड्यांना जंगलात सोडण्याचा निर्णय घेतील.
बछडे लहान असल्याने त्यांना शिकार करता येत नव्हती. वाघ व बिबट्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे, याकरिता दोन्ही बछड्यांना सुरक्षितरित्या फिजिकली रेस्क्यू करण्यात चमूला यश आले. ट्रॅक्युलाईज न करता किंवा कोणतेही इंजेक्शन न देता बछड्यांना ताब्यात घेऊन गोरेवाडा येथे पाठवण्यात आले आहे.
- रणजित जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, घाटंजी.