संजय भगत, महागाव (यवतमाळ): गौण खनिजाची चोरी होत असल्याच्या माहितीवरून महागाव तहसील कार्यालयाचे तलाठी मंडळ अधिकारी व त्यांचे इतर सहकारी काळी टेंभी येथे गेले असता माती भरून चोरून नेत असल्याचे काही ट्रॅक्टर त्यांच्या हाती लागले होते. त्याची कार्यवाही करत असताना अचानकपणे गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमानी तलाठी मंडळ अधिकारी व शासकीय वाहनाचे चालक आडे यांच्यावर चांगलाच जीवघेणा हल्ला केला आहे. त्यामध्ये तलाठी गणेश मोळके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंडळाधिकारी संजय नरवाडे वाहन चालक आडे यांनाही मारहाण करण्यात आली ही घटना बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान उघडकीला आली आहे. घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली असून या घटनेमुळे महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी यांनी महागाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यावेळी तालुक्यातील गौण खनिज चोरी बाबत फुलसावंगी परिसराचे तलाठी व मंडळ अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले होते. कार्यवाही टाळण्यासाठी तहसीलचे पथक बुधवारी रात्री दहा वाजता फुलसावंगी परिसरामध्ये कार्यवाही करण्यासाठी गेले असता या पथकावर हल्ला चढवण्यात आला आहे. उशिरावर अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.