अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सामान्यपणे हवेतील ध्वनीकंपने कर्णपटलावर आदळल्यानंतरच माणसाला ऐकू येते. मात्र ज्यांचे कर्णपटल फाटलेले आहे अशी माणसे कर्णबधीर म्हणून ऐकण्याच्या शक्तीपासून वंचित राहतात. आता मात्र अशा व्यक्तींना कर्णपटलाशिवायही ऐकता येणार आहे. जिल्ह्यातील एका चिमुकल्या विद्यार्थिनीचे संशोधन त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.स्मृती संजय कानिंदे असे या बाल वैज्ञानिक विद्यार्थिनीचे नाव आहे. केंद्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात तिचा हा प्रयोग गाजला. जिल्हास्तरावरून राज्य स्तरावर आणि आता राज्यस्तरावरून थेट राष्ट्रीय स्तरावर हा प्रयोग जाणार आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे दिल्लीच्या राष्ट्रीय प्रदर्शनात हा प्रयोग टिकल्यास जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात स्मृती पोहोचणार आहे. कर्णबधीर व्यक्तींना कोणताही आवाज ऐकता यावा यासाठी तिने श्रवणयंत्र तयार केले आहे. विशेष म्हणजे केवळ २५० रुपयात हे यंत्र तयार झाले. त्यामुळे कोणत्याही आर्थिक स्तरावरचा कर्णबधीर व्यक्ती या प्रयोगाचा सहज उपयोग घेऊ शकतो.हाडांच्या मदतीने ऐकाहवेतला ध्वनी कर्णपटलावर आदळल्यानंतर कर्णपटलाद्वारे त्याचे ध्वनीकंपनात रुपांतर होते. हे ध्वनीकंपन अंतर्गत कर्णापर्यंत (कोथेलीय) प्रक्षेपित केले जातात. तेव्हाच माणसाला आवाज ऐकू येतो. परंतु काही कंपने ही थेट अंतर्गत कर्णापर्यंत पोहोचविली जाऊ शकतात, यावर स्मृतीने विचार केला. आपण स्वत:चा आवाज अशाच पद्धतीने ऐकत असतो, याबाबत तिला विज्ञान शिक्षक अतुल ठाकरे यांच्याकडून माहिती मिळाली. त्यामुळे कर्णपटलाचा वापर न करता ध्वनीचे वहन करणारे श्रवणयंत्र तिने साकारले. त्यासाठी ऑडिओ ट्रान्स्फर कीटचा वापर करण्यात आला. ही कीट आवाजाचे रुपांतर कंपनात (व्हायब्रेशन) करतो. या कीटचा दुसरा भाग आपल्या दातात दाबून धरायचा असतो. त्यामुळे ध्वनीकंपन जबडा आणि हाडांच्या माध्यमातून थेट अंतर्गत कर्ण आणि तेथून मेंदूपर्यंत पोहोचविले जातात. हा प्रकार ‘अस्थिसंवहन’ या प्रकारात मोडत असल्याची माहिती स्मृतीचे मार्गदर्शक अतुल ठाकरे यांनी दिली. या प्रयोगात ऑडिओ ट्रान्स्फर कीटमध्ये ऑडिओ एम्प्लीफायर मोबाईल, व्हायब्रेटर वायर वापरण्यात आला. मोबाईलचा स्पीकर काढून तेथे व्हायब्रेटर बसविण्यात आल्याचे अतुल ठाकरे यांनी सांगितले.घाटंजीतून राष्ट्रीय स्तरावर पाचवी भरारीविज्ञान क्षेत्रात घाटंजीच्या विद्यार्थिनींनी सलग पाचव्यांदा राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. यापूर्वी शिप्रम कन्या शाळेतील अंजली गोडे (२०१४-१५), मृणाल विशाल भोयर (२०१५-१६), प्राजक्ता गजानन निकम (२०१६-१७), खुशी नरेंद्र अटारा व प्राजक्ता निकम (२०१८-१९) या विद्यार्थिनींचे प्रयोग राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले. तर आता २०२०-२१ या सत्रात स्मृती संजय कानिंदे हिचा प्रयोग अमरावतीच्या राज्यस्तरीय प्रदर्शनातून निवडला गेला. दिल्लीत एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनात ती सहभागी होणार आहे.
कर्णबधिरांनाही ऐकता येणार आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:00 AM
हवेतला ध्वनी कर्णपटलावर आदळल्यानंतर कर्णपटलाद्वारे त्याचे ध्वनीकंपनात रुपांतर होते. हे ध्वनीकंपन अंतर्गत कर्णापर्यंत (कोथेलीय) प्रक्षेपित केले जातात. तेव्हाच माणसाला आवाज ऐकू येतो. परंतु काही कंपने ही थेट अंतर्गत कर्णापर्यंत पोहोचविली जाऊ शकतात, यावर स्मृतीने विचार केला. आपण स्वत:चा आवाज अशाच पद्धतीने ऐकत असतो, याबाबत तिला विज्ञान शिक्षक अतुल ठाकरे यांच्याकडून माहिती मिळाली.
ठळक मुद्देविद्यार्थिनीने घडविले अनोखे श्रवणयंत्र : कर्णपटलाच्या मदतीशिवाय ध्वनी कंपनाचे संवहन