सतीश येटरे - यवतमाळअपुरे संख्याबळ, न मिळणाऱ्या सुट्या, कामाचा वाढता भार आणि कौटुंबिक जबाबदारी आदी कारणांनी मानसीक तणावात आलेल्या तब्बल १५ पोलिसांचा वर्षभरात कर्तव्यावरच मृत्यु झाला. सोमवारी रात्री वाहतूक शिपायाचा कर्तव्यावर झालेल्या मृत्युने मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तणावमुक्तीसाठी कुठल्याही उपाययोजना पोलीस खात्यात होताना दिसत नाही. परिणामी मानसिक तणावाची समस्या गंभीर होत आहे. वरिष्ठस्तराहून येणारे हायअलर्ट, राजकीय नेते आणि व्हीआयपींचे दौरे, निवडणुका, दंगलीच्या घटनांमुळे पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवावा लागतो. कोणताही सण असला तरी हातात दांडा घेवून कर्तव्य बजावावे लागे. कामाचा ताण कमी व्हावा आणि कुटुंबात वेळ घालविता यावा म्हणून गृह खात्याने पोलिसांना साप्ताहिक सुटी व वार्षिक सुट्या मंजूर केल्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वार्षिक तर सोडा साप्ताहिक सुटीही मिळत नाही. अचानक घडणाऱ्या गंभीर घटना माहिती होताच समोरचे ताटही सोडून धाव घ्यावी लागते. एकेकाकडे डझनावर तपास, रात्रंदिवस गस्त असते. वरिष्ठांचा त्रास आणि कामे करताना झालेल्या चुकातून चौकाशीचा ससेमीरा, निलंबन, याबाबी पोलिसांच्या तणावात भर घालतात. या व्यवस्तेत कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे शल्य चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते. त्यातूनच जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी कायम तणावात दिसतात. मात्र त्यांना तणावातून मुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. . गेल्या वर्षभरात एक दोन नव्हे तर तब्बल १५ पोलीस कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर मृत्यू झाला. सोमवारी रात्री प्रभाकर सिंगनजुडे या वाहतूक पोलीसाचा हृद्यविकाराने मृत्यू झाला. मंगळवारी वाघापूर मोक्षधामात शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी त्यांच्या पार्थीवाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर बंदुकीतून फैरी झाडून पोलिसांनी मानवंदना दिली. असे असले तरी कर्तव्य बजावताना मृत्यूची ही घटना पोलिसांच्या तणावाचे आणि त्यांच्या ढासळत्या आरोग्याचे वास्तवच मांडणारी ठरली आहे.
वर्षभरात १५ पोलिसांचा कर्तव्यावर मृत्यू
By admin | Published: January 13, 2015 11:06 PM