लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : वृद्धापकाळाने आईचा मृत्यू झाला. या धक्क्याने आईच्या अंत्यविधीनंतर मुलाचीही शुद्ध हरपली. काही कालावधीतच मुलाचीही प्राणज्योत मालवली. या घटनेने दिग्रस तालुका हळहळला.ध्रुपदाबाई पेदे असे मृत आईचे तर शंकर पेदे असे मुलाचे नाव आहे. या कुटुंबीयांचे मूळ गाव शेंबाळपिंपरी (ता. पुसद) आहे. शंकर दत्तराव पेदे हे दिग्रस येथील विश्वशांतीनगरात राहतात. जुन्या वस्तीत त्यांचे कालीका बेंगल्स हे बांगड्यांचे दुकान आहे. १९ जुलै रोजी वृद्धापकाळाने ध्रुपदाबाई (९२) यांचा शेंबाळपिंपरी येथे मृत्यू झाला. त्यामुळे ध्रुपदाबाईचा ही वार्ता समजताच दिग्रस येथून शंकर पेदे पत्नी व मुलांसह शेंबाळपिंपरी पोहोचले. आईचे अंत्यसंस्कार पार पडले. रात्री जेवण झाल्यावर शंकर पेदे (५५) यांना दम लागल्यासारखा त्रास जाणवू लागला. मोकळी हवा घेण्यासाठी ते घराबाहेर पडले. मात्र काही अंतरावरच चक्कर येऊन पडले. त्यांना उलटी झाली. डोक्याला, पायाला जखम झाली. शुद्धही हरविली. उपस्थितांनी त्यांना पुसदच्या क्रिटीकेअर रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच रात्री ९.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आई पाठोपाठच मुलानेही प्राण त्यागल्यामुळे दिग्रस आणि पुसद तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे. शंकर पेदे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत आपल्या मुलांना मोठे केले. मुलगा स्वप्नील बंगळूर येथे अभियंता आहे. मुलगी स्वाती एलएलबी झाली असून पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात कार्यरत आहे. दुसरी मुलगी श्रद्धा बीएससीनंतर पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. अशातच शंकर पेदे यांचा मृत्यू झाल्याने या परिवारावर मोठा आघात झाला आहे.
वृद्ध आई पाठोपाठ मुलाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:17 PM
वृद्धापकाळाने आईचा मृत्यू झाला. या धक्क्याने आईच्या अंत्यविधीनंतर मुलाचीही शुद्ध हरपली. काही कालावधीतच मुलाचीही प्राणज्योत मालवली. या घटनेने दिग्रस तालुका हळहळला. ध्रुपदाबाई पेदे असे मृत आईचे तर शंकर पेदे असे मुलाचे नाव आहे. या कुटुंबीयांचे मूळ गाव शेंबाळपिंपरी (ता. पुसद) आहे.
ठळक मुद्देदिग्रस, पुसद तालुका हळहळला : आईच्या अंत्यविधीनंतर मुलगा पडला बेशुद्ध