महागाव (यवतमाळ) : जिल्ह्यात २५ मार्च रोजी ‘आशा डे’निमित्त विविध कार्यक्रमांची लगबग सुरू असताना आशा वर्करचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील आंबोडा येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.
सीमा मारुती कारलेवाड (२६) असे मृत आशा सेविकेचे नाव आहे. शनिवारी महागाव येथे तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा डेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तालुक्यातील संपूर्ण आशा वर्कर्स उपस्थित राहणार होत्या. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी तयारीला लागलेल्या आंबोडा येथील आशा सेविका सीमा कारलेवाड यांना सकाळी ११ वाजता तारेवर कपडे वाळू घालत असताना इलेक्ट्रिकचा शॉक लागला. त्यांना जोराचा झटका बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुले व मोठा आप्त परिवार आहे. या घटनेची माहिती गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष हनवंतराव देशमुख यांनी प्रशासनाला दिली. या दुर्दैवी घटनेमुळे आयोजित कार्यक्रमावर विरजण पडले. आशा डेनिमित्त आयोजित कार्यक्रमाची लगबग सुरू असताना एका आशा सेविकेचा त्याच दिवशी मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने गावातही हळहळ व्यक्त होत आहे.