पुसद : सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका दहावीच्या विद्यार्थ्याचा लोंबकळणाऱ्या वीज तारांना स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बान्शी येथे सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. विशाल विजय आडे (१७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, बान्शी येथे ग्रामपंचायतीची सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर आहे. विशाल सोमवारी सकाळी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेला. त्याचवेळी विहिरीच्या बाजूला विद्युत खांबावर विजेच्या जिवंत तारा लोंबकळत होत्या. विशालचा अचानक या तारांना स्पर्श झाला. त्याला जबर धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. विशाल हा बान्शी येथील जेएसपीएम विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी होता. सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीची वीज थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने कापली होती. त्यामुळे जिवंत तारा लोंबकळत होत्या. त्याचाच परिणाम विशालचा बळी गेल्यात झाली, अशी संतप्त भावना गावकरी व्यक्त करीत आहे. (प्रतिनिधी)
विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: March 15, 2017 12:13 AM