प्रकाश सातघरेलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : मृत्यू कुठे कधी कसा माणसाला गाठेल सांगता येत नाही. जीवनातील अडी-अडचणींचा निपटारा व्हावा म्हणून माणूस आपल्या श्रद्धास्थानाकडे धाव घेतो. मात्र, अशा श्रद्धेच्या वारीदरम्यानच कधी-कधी मृत्यू वाटेत दबा धरून बसलेला असतो. दिग्रसमधील पाच युवकांवरही रविवारी काळाने असाच घाला घातला. नागपूर जिल्ह्यात नदीत बुडून बेपत्ता झालेल्या या पाच युवकांच्या घरात एक हलकल्लोळ उडाला आहे.दिग्रस शहरातील बाराभाई मोहल्ल्यातील १२-१३ युवक खासगी वाहनाने नागपूर येथील ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदलसाठी शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निघाले होते. पहाटे नागपूर येथे दर्गाहवर पाेहोचल्यावर त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते सर्व जण नागपूर जिल्ह्यातीलच कामठी येथील दुसऱ्या अम्मा दर्गाहवर गेले. सकाळी यामधील खाजा बेग कालू बेग (१९), अयाज बेग हाफीज बेग (२२), सय्यद लक्की सय्यद परवेज (२०), सबतैन शे. इकबाल (२०), मुहम्मद अबुजर मुहम्मद अल्ताफ (२०) हे युवक कन्हान नदीत आंघोळीला उतरले; परंतु नदीचा प्रवाह वेगवान असल्याने ते अचानक वाहून गेले. प्रशासनाने त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे.यापैकी चार युवकांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुहम्मद अबुजर हा आई-वडिलांना एकुलता होता. खाजा बेग कालू बेग हा नवव्या वर्गात शिकतो. त्याला आई-वडील, एक भाऊ असून वडील फळविक्रीचा व्यवसाय करतात. अय्याज बेग हाफीस बेग हा बारावीचा विद्यार्थी असून त्याचे वडील सायकल स्टोअर्सचा व्यवसाय करतात. आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा त्याचा परिवार आहे. सै. लक्की सै. परवेज हा बीएला शिकत असून त्याला वडील नाहीत. त्याच्या वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. शे. अबुजर शे. अलताप हा अकरावीत शिकत असून त्याच्या परिवारात आई-वडील, दोन बहिणी आहेत. त्याचे वडील नगर परिषदेमध्ये नोकरीला आहेत. शे. सबतैन शे. इकबालला आई-वडील, एक बहीण, एक भाऊ असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील दुकानात काम करतात.अत्यंत सर्वसामान्य परिवारातील पाच मुले एकाच वेळी नदीत बुडून बेपत्ता झाल्याने पाच कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. हे पाचही परिवार रविवारी सकाळीच नागपूर-कामठीकडे रवाना झाले.
दिग्रसच्या बाराभाई मोहल्ल्यात शोककळाबाराभाई मोहल्ला हा सतत चहलपहल असणारा मोहल्ला आहे. मात्र रविवारी या भागातील पाच जण बुडाल्याची वार्ता कळताच मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे. या वाॅर्डातील रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.