लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूखंड गैरव्यवहार गाजत असतानाच बँकांमधून वितरित केल्या गेलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रामभरोसे कर्जाची प्रकरणेही उघड होऊ लागली आहे. यवतमाळातील एका शहरी बँकेने धामणगाव रेल्वेतील ले-आऊटला बाभूळगाव शाखेतून दिलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज जवळजवळ बुडित खात्यात गेल्याची माहिती आहे. या कर्जापोटी तारण ठेवलेले भूखंड ले-आऊटधारकाने केव्हाच विकून मोकळे केले, हे विशेष.आर्णीतील एक व यवतमाळातील दोन अशा तीन प्रतिष्ठीतांनी काही वर्षांपूर्वी धामणगाव रेल्वे येथे ले-आऊट थाटले होते. ८० ते ८५ प्लॉट असलेल्या या ले-आऊटवर शहरी बँकेच्या बाभूळगाव शाखेतून पाच ते सात कोटींचे कर्ज उचलले गेले. कर्ज भरल्यानंतर विक्रीसाठी प्लॉट रिलीज केला जातो. परंतु या ले-आऊटधारकांनी प्लॉट रिलीजचे बोगस पत्र तयार करून परस्पर या भूखंडांची विक्री केली. बँकेच्या लेखी आजही हे भूखंड तारण दाखविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात या भूखंडांची केव्हाच विक्री झाली आहे. आजच्या घडीला ले-आऊटवर सव्वादोन कोटींचे कर्ज बाकी आहे. तर तारणात केवळ ३० ते ३५ लाख रुपये किंमतीचे दोन ते तीन प्लॉट प्रत्यक्ष शिल्लक असल्याची माहिती आहे. कागदावर मात्र तारण असलेल्या प्लॉटची संख्या बरीच मोठी आहे. या कर्ज प्रकरणात सदर शहरी बँकेच्या बाभूळगाव शाखेतील तत्कालीन यंत्रणा गुंतलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षिणेतील श्रीमंत देवाच्या नावाने थाटलेल्या या ले-आऊटमधील भूखंड खरेदी केलेले ग्राहक मात्र या कारनाम्यांबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता आहे. बँकेला हे संपूर्ण प्रकरण माहीत असतानाही अद्याप कोणतीच ठोस कारवाई केली गेली नसल्याने बँकेच्या यवतमाळ मुख्यालयातील प्रमुख यंत्रणाही या कर्जाचे ‘लाभार्थी’ नाही ना अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.८० लाखांच्या वसुलीसाठी पाच कोटींचे कर्जइनकम व खर्चाचे आकडे जुळविण्यात तज्ज्ञ असलेल्या दत्त चौक भागातील प्रतिष्ठीताकडे सदर शहरी बँकेचे ८० लाख रुपये थकीत होते. अनेक वर्ष या कर्जाची वसुली झाली नाही. अखेर या ८० लाखांच्या वसुलीसाठी सदर तज्ज्ञाला तब्बल पाच कोटी रुपये कर्ज बँकेने मंजूर केले. त्यापोटी पुरेसे तारणही घेतले नसल्याची माहिती आहे.
धामणगावच्या ले-आऊटवरील कोट्यवधींचे कर्ज बुडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 9:54 PM
भूखंड गैरव्यवहार गाजत असतानाच बँकांमधून वितरित केल्या गेलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रामभरोसे कर्जाची प्रकरणेही उघड होऊ लागली आहे.
ठळक मुद्देशहरी बँक : बाभूळगाव शाखेत तारण भूखंड परस्पर विकले