विडूळ : काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने विडूळ पीएचसीची रुग्णवाहिका दे धक्का, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे अखेर पीएचसीला रुग्णवाहिका मिळाली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा नियोजन समितीच्या आपत्ती व्यवस्थापन आणि खनिज विकास निधीतून रुग्णवाहिका मिळाली आहे. तिचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मागील कित्येक वर्षांपासून रुग्णवाहिका असून, नसल्यासारखीच होती. ही रुग्णवाहिका रस्त्यात कधी रूसून बसेल, हे सांगता येत नव्हते. आता जिल्हा नियोजन समितीच्या आपत्ती व्यवस्थापन आणि खनिज विकास निधीतून उमरखेड व महागाव तालुक्यातील आरोग्य केंद्रांसाठी पाच रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यातील एक रुग्णवाहिका विडूळ आरोग्य केंद्राला मिळाली.
लोकार्पण कार्यक्रमाला छाया धूळध्वज, प्रयाग कोत्तेवार, दत्तराव शिंदे, बाळासाहेब सुरोशे, सुभाष शिंदे, सरपंच प्रभावती धोपटे, उपसरपंच अमोल लामटीळे, पंचायत समिती सदस्य बालाजी आगलावे, डॉ. भारत चव्हाण, गजानन बोन्सले, गणेश बेले, पंजाबराव भालेराव, जगदीश धुळे, ॲड. प्रेमराव वानखेडे, दत्तराव कदम, प्रभाकर कदम, कुंडलिक कदम, अवधूत वानखेडे, डॉ. श्रीराम शिंदे आदी उपस्थित होते.