मे हीटचा तडाखा : विहिरी, बोअरवेल कोरड्या, १२ गावांत ११ टँकर पुसद : तालुक्यातील ग्रामीण भाग पाण्यासाठी तडफडत आहे. मे हिटच्या तडाख्यात पाण्याची पातळी प्रचंड घटल्यामुळे पाण्याचा थेंबही मिळणे दुरापास्त झाले आहे. ठिकठिकाणच्या विहिरी आणि बोअरवेल्स कोरड्या पडल्या असून १२ गावात ११ टँकरद्वारे तहान भागविली जात आहे. पुसद तालुक्यात १८० गावे व ११९ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. विदर्भात पुसद शहर आणि तालुका प्रचंड तापमानासाठी प्रसिद्ध आहे. यंदाही तालुक्यातील नागरिकांना मे हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे जाणवत आहे. ४ मे रोजी आलेल्या वादळी पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. परंतु त्यानंतर जणू सूर्य आगच ओकू लागला आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे तालुक्यातील विहिरी, नाले, बोअरवेल असे सर्वच जलस्त्रोत कोरडे पडले आहे. पंचायत समितीस्तरावरून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू आहे. नवीन विंधन विहीर, नळयोजना, विशेष दुरुस्ती, खासगी विंधन विहीर अधिग्रहण करणे आदी कामांसाठी तब्बल ८० लाख रुपयांच्या निधीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. सध्या तालुक्यातील १२ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये कारला (देव), अनसिंग, म्हैसमाळ, पन्हाळा, कृष्णनगर, येलदरी, उल्हासवाडी, उपवनवाडी, बाळवाडी, बुटी, वडसद, मारवाडी खु. आदी गावांचा समावेश आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पंचायत समितीचा पाणीटंचाई आराखडा केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी तहानलेली जनता करीत आहे. (प्रतिनिधी)पूस धरणातील साठा १९७२ च्या दुष्काळापेक्षाही कमीपुसद : सरासरी पाऊस होणाऱ्या पुसद तालुक्यात जलसाठा करण्यासाठी शासनाने तीन धरणे व अनेक लघु पाटबंधारे तसेच शेततळी बांधण्यात आली. शहरासह तालुक्याची तहान भागेल, असा विक्रमी जलसाठा तालुक्यातील धरणात होतो. तालुक्याला हंडामुक्त करण्याच्या उद्देशाने शासनाने विविध योजनांमधून प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. तरी अनेक योजना फक्त कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून निधी हडप केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. वनवार्ला, इसापूर, वेणी येथे धरणे असून या धरणात चांगला जलसाठा होता. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ही धरणे भरली नसली तरी असलेला जलसाठा सिंचन व पिण्यासाठी पुरेसा होता. मात्र पूस धरणातून शासनाने डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पाण्याचा मोठा विसर्ग केल्याने नववर्षाच्या प्रारंभीच पूस धरणात केवळ २० टक्के एवढाच जलसाठा होता. त्यानंतर शिल्लक पाण्यावर तालुक्याची भिस्त असताना धरणाने तळ गाठला. पाऊस कमी पडला तर १९७२ च्या दुष्काळाचे उदाहरण जुन्या जाणत्यांकडून दिले जाते. माणसे पाणी-पाणी करत मृत्यू पावल्याचे सांगितले जाते. या दुष्काळाच्या काळात पुसद परिसरात पूस धरण वगळता मोठे धरण नव्हते. तसेच त्यावेळी पाण्याची मागणीही तुलनेने कमी होती. सध्या पूस धरणात दोन टक्के जलसाठा आहे. १९७२ च्या दुष्काळातदेखील या धरणाचा जलसाठा एवढा घटला नव्हता. त्या तुलनेत आता पाण्याची मागणीही प्रचंड वाढली आहे. या परिस्थितीमुळे पुसदकरांना पहिल्यांदाच तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. याला पूर्णत: प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. योग्य नियोजन नसल्याने जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुसद गावात यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्याईने पूस धरणाची निर्मिती झालेली असतानाही नागरिकांना या धरणाचे पाणी पुरत नाही. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: May 22, 2016 2:06 AM